कथित आर्थिक गैरव्यवहारावरून कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अटक केली. त्यांच्या अटकेवरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनीही शिवकुमार यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या पाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणांनी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांना अटक केली. कर्नाटक विधानसभेवर सातवेळा निवडून गेलेले शिवकुमार यांची गेले पाच दिवस ‘ईडी’कडून चौकशी सुरू होती. करचुकवेगिरी आणि हवाला प्रकरणी प्राप्तिकर विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून गेल्या सप्टेंबरमध्ये ईडीने त्यांच्यासह त्यांचा सहकारी एस. के. शर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

शिवकुमार यांना अटक केल्यानंतर कर्नाटक काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक बंदची हाक दिली असून, राजकीय सूडातून ही कारवाई होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. “शिवकुमार यांच्या अटकेमुळे मला आनंद झालेला नाही. डी. के. शिवकुमार या प्रकरणातून लवकर बाहेर यावेत, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी कुणाचाही तिरस्कार केलेला नाही. तसेच कुणाचा वाईट व्हाव असा विचारही केलेला नाही. अशा प्रकरणांमध्ये कायदा त्याचे काम करतो”, असे येडियुरप्पा म्हणाले आहेत.

दरम्यान, ईडीने आधी दिलेल्या समन्सविरोधात शिवकुमार यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात केलेली याचिका गुरुवारी फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्याच रात्री ईडीने नव्याने समन्स काढून त्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावले होते. त्यांची चौकशी सुरू झाली तेव्हापासूनच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत गर्दी केली होती. मंगळवारी अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता नेले जात असताना ईडी मुख्यालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ईडी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.