भारत-चीनमध्ये डोकलाम मुद्द्यावरून तणाव असतानाच योगगुरू रामदेव बाबा यांनी चीनवर ‘बहिष्कारास्त्र’ डागलं आहे. चीनला आर्थिकदृष्ट्या पराभूत करायचं असल्यास देशातील नागरिकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालणं गरजेचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त पतंजली योगपीठात १०० फूट उंचावर तिरंगा फडकवण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित समुदायाला संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केलं. ‘आक्रमक बाणा’ काय असतो ते चीनला समजू दे. आर्थिकदृष्ट्या मागे टाकण्यासाठी भारतानं प्रयत्न करणे गरजेचं आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पतंजली योगपीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी १०० फूट उंचावर तिरंगा फडकवण्यात आला. यानंतर रामदेव बाबा यांनी उपस्थित नागरिकांना संबोधन केलं. भारत-चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. तसंच चीनकडून भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. हाच धागा पकडून त्यांनी ‘स्वदेशी’चा नारा देत चीनला लक्ष्य केलं. भारताला २०४० पर्यंत महाशक्ती करायचं असल्यास चीनच्या उत्पादनांवर देशातील नागरिकांनी बहिष्कार घालावा, असं आवाहन त्यांनी केलं.

याआधीही त्यांनी चीनवर तोफ डागली होती. चीनला ‘जशास तसं’ उत्तर देण्याची गरज आहे. योगाच्या माध्यमांतून शांततेबाबत बोलत आहोत. पण एखाद्याला ही भाषाच कळत नसेल तर, त्याला युद्धाच्या भाषेतच उत्तर द्यायला हवं, असं ते म्हणाले होते. डोकलाम मुद्द्यावरून युद्धचर्चेचं मोहोळ उठलं आहे. त्यानंतर चीनच्या सरकारी वृत्तपत्रांतून वारंवार युद्धाच्या धमक्याही दिल्या जात आहेत. पण स्वतःहून युद्धाला आमंत्रण देणार नाही, अशी भूमिका भारतानं मांडलेली आहे.