योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद वाद सुरु असताना अभिनेता अक्षय कुमार याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमारनं अ‍ॅलोपॅथीवर भाष्य करणं टाळलं असली तरी आयुर्वेदाची स्तुती केली आहे. नेमका हाच व्हिडिओ योगगुरु रामदेव यांनी शेअर करत अ‍ॅलोपॅथीवर निशाणा साधला आहे.

‘आपण आपल्या शरीराचे ब्रँड अँबेसेडर व्हा. साधं आणि निरोगी आयुष्य जगा. आमच्या भारतातील योग आणि आयुर्वेदात किती शक्ती आहे हे जगाला दाखवून देऊ. ही शक्ती इंग्रजांच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही’, असं कॅप्शन योगगुरु रामदेव यांनी दिलं आहे. यापूर्वी योगगुरु रामदेव यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर करत अ‍ॅलोपॅथीवर निशाणा साधला होता.

योगगुरु रामदेव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमार आयुर्वेदावर बोलताना दिसत आहे. ‘माझ्या बाबतीत खूप कमी लोकांना माहिती आहे. मी मागच्या २५ वर्षांपासून आयुर्वेद फॉलो करत आहे. निसर्गाने आपल्याला खूप मोठा आयुर्वेदीक खजाना दिला आहे. मात्र आम्हाला त्याची कदर नाही. आपण इंग्रजांची औषधं खातो आणि स्टेरॉयड इंजेक्शन घेतो. आपण त्यांची उपचार पद्धती फॉलो करतो आणि ते लोकं आयुर्वेदात उपचार शोधत आहेत’, असं अक्षय कुमार त्या व्हिडिओत बोलत आहे.

“माझी लढाई अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांविरोधात नाही, तर…”; योगगुरु रामदेव यांनी मांडली बाजू

योगगुरु रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी अ‍ॅलोपॅथीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आयएमए आणि योगगुरु रामदेव यांच्यात वाद वाढत गेला. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांना विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यांनी विधान मागेही घेतलं. मात्र पुन्हा २५ प्रश्न विचारत आयएमएला आव्हान दिलं. गेल्या काही दिवसांपासून योगगुरु रामदेव आणि आयएमए यांच्यात सुरु असलेला वाद संपण्याचं नाव घेत नाही.