उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी विरोधी पक्षांवर टीका करताना विरोधकांनी नेहमीच दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली, पण मोदी सरकारने त्यांना गोळ्या दिल्या असं वक्तव्य केलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूर मतदारसंघातील काँगेसचा उमेदवार मसूद अझहरचा जावई असल्याचंही म्हटलं. सहारनपूर येथे आयोजित एका रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या जावयाने आपल्या मतदारसंघात प्रवेश केला असून तो दहशतवादी मास्टरमाइंडची भाषा बोलत आहे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने सहारनपूर येथून इमरान मसूद यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

इमरान मसूद यांनी योगी आदित्यनाथ यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही एखाद्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. जर देशाला माझं शिर हवं असेल तर मी देण्यास तयार आहे. भारतमाता जितकी योगींची आहे तितकीच माझीही आहे’, असं इमरान मसूद यांनी म्हटलं आहे.

‘सहारनपूर येथून कोण जिंकणार याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जो अझहर मसूदची भाषा बोलतोय त्याला की मोदींच्या जवानाला’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी लोकांना भाजपाचे उमेदवार राघव लखनपाल यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मसूद अझहरची ओसामा बिन लादेनसारखीच परिस्थिती होईल असंही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

‘तुम्ही ओसामा लादेनबद्दल ऐकलं असेल. त्याची हत्या करण्यात आली होती. अझहर मसूदलादेखील त्याच पद्धतीने ठार करण्यात येईल’, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. भाजपा देश उभारणीसाठी बांधील असून कोणत्याही देशद्रोहीला भारताच्या एकात्मतेला धोका पोहोचवू देणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांना टार्गेट केलं. ‘काही पक्षांनी दहशतवाद्यांना बिर्याणी देऊ केली. पण मोदी सरकारकडे दहशतवाद्यांसाठी एकच औषध आहे ते म्हणजे गोळ्या आणि बॉम्ब’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी सपा-बसपा आघाडीला टोला लगावताना, 37 ते 38 जागा लढवणाऱे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहेत असं म्हटलं.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना योगी आदित्यनाथ यांनी अरुण जेटली यांनी मेंदू नसलेला व्यक्ती म्हटलं असल्याची आठवण करुन दिली. ‘राहुल गांधी यांनी भारतीय संस्कृतीची जाण नाही. म्हणूनच जेव्हा काशी विश्वनाथ मंदिरात गेले तेव्हा प्रार्थना करताना नमाज करण्यासाठी बसतात तसे बसले होते’, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.