प्रत्येक नागरिकाला सुरक्षा पुरविण्यास आपले सरकार बांधील आहे, अराजक माजविण्याचा जे प्रयत्न करतील त्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी समाजकंटकांना दिला. उत्तर प्रदेशातील कासगंज येथे गेल्या आठवडय़ात जातीय दंगलीचा उद्रेक झाला त्यामध्ये एकाचा बळी गेल्यानंतर आदित्यनाथ यांनी वरील इशारा दिला आहे.

कासगंजचा हिंसाचार उत्तर प्रदेश राज्यावरील कलंक असल्याचे मत राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आदित्यनाथ यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे. देशभरात कोठेही अशा प्रकारची घटना घडली तर केंद्रीय गृहमंत्रालय अहवाल मागवितो, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

दंगलीत ज्यांचा हात असेल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा राम नाईक यांनी व्यक्त केली, सरकारने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, गेल्या आठ-नऊ महिन्यांत उत्तर प्रदेशात अशी घटना घडली नाही, जातीय हिंसाचाराचा उद्रेक होणे आपल्यासाठी शरमेची बाब आहे, असे राज्यपाल म्हणाले. राज्यपालांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकारने कासगंजचे पोलीस अधीक्षक सुनीलकुमार सिंह यांची मेरठमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली केली.

दंगलीत ठार झालेला युवक अल्पसंख्य समाजाचा असता तर माध्यमांनी वेगळा मार्ग अवलंबिला असता, असे मत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले. भाजपचे नेते विनय कटियार यांनीही, काही समाजकंटकांचा पाकिस्तानला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले.