उत्तर प्रदेशातील भाजपप्रणित सरकार राजकीय विरोधकांना बदनाम करीत असून त्यांची छळवणूकही करीत आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. राजकीय विरोधकांच्या चौकशा चालू करून छळवणूक केली जात आहे पण  या सरकारने जे पेरले तेच नंतर उगवणार आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ सरकार खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे. समाजवादी पक्षाने सुरू केलेल्या योजना स्वत: सुरू  कल्याचे सांगून फसवणूक करीत आहे. जल निगमच्या भरती प्रकरणात समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. लोकांना रोजगार देण्याऐवजी हे सरकार आम्ही ज्यांना रोजगार दिले त्यांचे रोजगार हिसकावत आहे. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्ग व गोमती रीव्हर फ्रंट प्रकल्प आधीच्या सरकारने सुरू केले पण आताचे सरकार त्यावर दिशाभूल करीत आहे. राजकीय विरोधकांच्या चौकशा सुरू आहेत, पण ते जे पेरत आहे तेच त्यांना आता नडणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी गाझीयाबादच्या उन्नत रस्त्याचे पुन्हा उद्घाटन केले. ते आधीच आम्ही केलेले  होते. आदित्यनाथ आमच्यावर परिवारवादाचा आरोप करतात पण या रस्त्यावर  कोणती यादव मार्गिका आहे दाखवून द्यावे. राजकारणात मला आताचे स्थान परिवारवादामुळे मिळाले हे खरे आहे पण राजकीय जीवनात अनेक आव्हानेही पेलावी लागली आहेत.

आठवलेजी चांगले मंत्री आहेत त्यांनी  बहुजन समाज पक्षाला एनडीएत येण्याचे आवाहन केले आहे. मी जेव्हा खासदार होतो तेव्हा सभागृहाची करमणूक त्यांच्या इतकी कुणी केली नाही. सपा व बसपा यांच्या समझोत्याने भाजप आता घाबरला आहे पण देशातील ४५ राजकीय पक्षात समझोता होईल तेव्हा भाजपचे काय होईल याचा विचारच केलेला बरा. भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. शिक्षक, शिक्षा मित्र, इतरांना लाठय़ा खाव्या लागत आहेत. नोकऱ्या मिळणे तर दूरच राहिले सध्या ज्या जागा रिकाम्या आहेत त्यावरही रोजगार देण्यास सरकार तयार नाही. या सरकारने विकासकामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सपा-बसपा युतीबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.