राज्य सरकारचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकासकामे केली जाणार नाहीत. दिलेला शब्द पाळणे, हे आपले तत्त्व आहे, असे स्पष्ट करत, ‘आरे’मधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. या निर्णयाचा पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने चक्क ६३ हजार झाडे कापणार आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या लखनौमध्ये होणाऱ्या ‘डिफेक्स्पो’ प्रदर्शनासाठी ही वृक्षतोड केली जाणार आहे.
लखनौ हे देशातील अव्वल दहा सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक आहे. कानपूर आणि लखनौ ही देशातील सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक असतानाच योगी सरकारने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गोमती नदीकाठची ६३ हजार ७९९ झाडे कापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये येथे ‘डिफेक्स्पो’ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. याच प्रदर्शनसाठी मोकळी जागा निर्माण करण्याचा दृष्टीने ही वृक्षतोड करण्यात येणार असल्याचे समजते.
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृततानुसार लखनौ विकास प्राधिकरणाने (एलडीए) यासंदर्भात लखनौ महानगरपालिकेला हनुमान सेतू ते निशांतगंज पूलापर्यंतची झाडे तोडण्याची सुचना केली आहे. या ठिकाणी ‘डिफेक्स्पो २०२०’ भरवण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद केलं आहे. या जमिनीवरील वृक्षतोड केल्यानंतर या जमिनीचा तात्पुरता ताबा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) देण्यात येणार आहे. एचएएल डिफेक्स्पो २०२० चे आयोजन करणार आहे. ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन भरवले जाणार आहे.
या जमीनीवर आयोजित करण्यात आलेले डिफेक्स्पो प्रदर्शन संपल्यानंतर येथे पुन्हा झाडे लावली जातील असं एलडीएने म्हटलं आहे. तसेच वृक्षतोड करण्यात येणाऱ्या काही झाडांचे पुनर्रोपण करण्याचाही विचार असल्याचे एलडीएने स्पष्ट केलं आहे. एलडीएने वृक्षतोड केल्यानंतर त्या जागी पुन्हा झाडे लावण्यासाठी महापालिकेकडून ५९ लाख रुपयांची मागणी केली आहे. एलडीएचे अध्यक्ष एम. पी. सिंग यांनी ही झाडे लावण्यासाठी आम्ही ५९ लाख सहा हजार रुपये खर्च केल्याचं पत्रामध्ये म्हटलं आहे. मात्र ही झाडे तोडण्याऐवजी ती दुसरीकडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्तावर महापालिकेने पाठला होता. मात्र सध्याच्या हवामानामध्ये झाडांचे पुनर्रोपण करणं शक्य होणार नसल्याचे एलडीएच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. “झाडांचे पुनर्रोपण केलं तर ती मरण पावतील. प्रदर्शन झाल्यानंतर नदीकाठची जमीन आणि झाडांचे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे,” असं एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले आहे. १५ जानेवारी २०२० पर्यंत या परिसरातील सर्व झाडे तोडून व्हावीत अशी एलडीएची सूचना आहे.
लखनौमध्ये पहिल्यांदाच डिफेक्स्पोचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये पायदळ, नौदल व अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आधुनिक शस्त्रास्त्रे व उपकरणांचा आविष्कार पाहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील सुरक्षातज्ज्ञ आणि अधिकारी हजेरी लावणार आहे.