एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी बोलण्यासाठी उभे असतानाच एका तरुणीनं व्यासपीठावर येऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ ‘एएनआय’नं ट्विट केला आहे. ओवेसी यांच्या बंगळुरू येथील सभेदरम्यान ही घटना घडली आहे.

सीएए आणि एनआरसी विरोधात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओवेसी यांचं भाषणही झालं. मात्र, ओवेसीं भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर एका तरुणीनं व्यासपीठावर गोंधळ घातला. अमुल्या नावाच्या तरुणीनं अचानक व्यासपीठावर येऊन माईक हातात घेतला आणि बोलण्यास सुरूवात केली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिने तिचं बोलणं सुरूच ठेवलं.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी तिच्या हातातील माईक हिसकावून घेतला. तसेच तिला बाजूला जाण्यास सांगितलं. मात्र, तरुणीनं व्यासपीठावर समोर येत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते असं सांगत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तिने अशा घोषणा देण्यास सुरूवात केल्यानंतर ओवेसींनी तिला धावत जाऊन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शांत होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी तिला ओढत व्यासपीठावरून खाली नेलं.

हा सगळा प्रकार ओवेसी यांच्यासमोरच घडला. त्यानंतर ओवेसी यांनी या घटनेवर खुलासाही केला. “तरुणीनं दिलेल्या घोषणांचा मी निषेध करतो. ज्या तरुणीनं घोषणा दिल्या, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारतच जिंदाबाद होता आणि जिंदाबाद राहिल,” ओवेसी यांनी या प्रकारावर म्हटलं आहे.

वारिस पठाण यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्य –

आजच एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं. “केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही. विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं. आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो, तर काय होईल. १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा,” असं एमआयएमचे पठाण म्हणाले आहेत.