तुम्ही कार कशी चालवता तसेच तुमच्या हातून किती अपघात झाले आहेत, यावर आता तुमच्या वाहनाच्या विम्याचा हप्ता ठरणार आहे. यासंदर्भात विमा कंपन्यांसाठी नवे धोरण आणण्यात येणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटीने (आयआरडीए) यासाठी नियमावली तयार केली आहे.

ग्राहक त्याचे वाहन कसे चालवतो तसेच त्याचा प्रत्यक्ष अपघातांमध्ये किती सहभाग आहे, यावर संबंधित ग्राहकाच्या वाहनाचा हप्ता निश्चित करण्याबाबत आयआरडीएने प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी ९ सदस्यीय पॅनेल नेमण्याची शिफारिश करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमभंगांबाबत नव्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठीचा आराखडा आणि त्याच्याशी विम्याचा हप्ता जोडण्याची योजना कशी असेल? याचा सविस्तर अहवाल येत्या दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश आयआरडीएने या पॅनलला दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

यापूर्वी गृहसचिवांच्या अखत्यारित एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दिल्लीतील वाहतूक व्यवस्थापनावर देखरेख करीत आहे. दरम्यान, आयआरडीएने पॅनेलला त्वरित यासंदर्भातील पायलट प्रोजेक्ट साकारण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यास सांगितले असले तरी नजीकच्या काळात हा प्रकल्प इतर शहरांमध्ये व राज्यांसाठी लागू होऊ शकतो.

वाहतुकीच्या नियमांबाबत जागरुकतेसाठी देशात अशा प्रकारची योजना पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. धोकायदायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्या चालकांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या वाहनाचे विमा हप्ते कसे सिस्टिमशी जोडता येईल यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहेत. काही पाश्चिमात्य देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. चालकाची वाहन चालवतानाचे वागणे हेच ७० टक्क्यांपेक्षा अधिक अपघातांना कारणीभूत असल्याचे जगभरात सिद्ध झाले आहे.

दरम्यान, सरकारने इन्शूरन्स कंपन्यांना अपघातात मृत्यू झालेल्यांना १० लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना ५ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाईत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जर अपघातांचे प्रमाण आणि त्यातील मृत्यूंचे प्रमाण कमी झाले तर इन्शूरन्स कंपन्यांची देखील एकूण नुकसानभरपाईचा खर्च कमी होईल. त्यामुळे इन्शूरन्स कंपन्यांसाठी देखील भविष्यात व्यावसायासाठी याचा नेमका फायदा होईल, असे वाहतुक मंत्रालयातील अधिकाऱ्याने म्हटले आहे.