ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१७ मधील शब्द म्हणून युथक्वेक या शब्दाची निवड केली आहे. गेल्या वर्षी पोस्टट्रथ या शब्दाची निवड करण्यात आली होती. युथक्वेक याचा अर्थ तरुण मतदारांमध्ये निर्माण झालेली राजकीय जागरूकता असा आहे. युथक्वेक या शब्दाची व्याख्या करताना म्हटले आहे, की सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक बदल जर तरुणांच्या कृती किंवा प्रभावातून घडून आले, तर त्याला युथक्वेक असे म्हणतात. गेल्या वर्षी ब्रेक्सिट व ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजयानंतर वापरला गेलेला पोस्टट्रथ हा ऑक्सफर्डने वर्षांतील शब्द ठरवला होता. या वेळी आम्ही युथक्वेक शब्दाची निवड ही त्याची प्रचिती व भाषिकता यातून केली आहे.

जेव्हा तरुणांमधील अस्वस्थता बाहेर येते आहे, तेव्हा हा वेगळा राजकीय शब्द आहे, असे आम्हाला वाटते, असे मत ऑक्सफर्ड डिक्सनरीजचे कॅस्पर ग्रॅथवोल यांनी म्हटले आहे. आजच्या काळातील ध्रुवीकरणाच्या वातावरणात नवीन मतदार हे खुल्या मनाचे असून ते त्यांचा आवाज पुढील काळात राजकारणात उमटवणार आहेत. २०१७ मध्ये या शब्दाचा वापर पाच पट वाढला. साधारण या वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात वापर वाढल्याचे दिसून आले. जूनमध्ये ब्रिटनमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात तरुण मतदारांनी मजूर पक्षाला विजय मिळवून दिला. तेव्हा हा शब्द जास्तच प्रचलित होता.

त्यानंतर न्यूझीलंडमध्ये सप्टेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातही या शब्दाचा वापर करण्यात आला. त्यातून तरुणांच्या मदतीने नवे अल्पमतातील सरकार आले. युथक्वेक हा शब्द डायना रिलँड या व्हॉग नियतकालिकाच्या संपादकांनी प्रचारात आणला. त्या वेळी ब्रिटिश युवा संस्कृती फॅशन व संगीताच्या क्षेत्रात बदलत होती, तो काळ १९६० मधील होता.  त्यानंतर पुन्हा पाच दशकांनी युथक्वेक हा शब्द पुन्हा प्रचारात आला. आता त्याचा अर्थ नवीन आहे तो म्हणजे सहस्रक पिढीतील तरुणांची राजकीय जागरूकता. यात अँटिफा (अँटीफॅसिस्ट), ब्रोफ्लेक (पुरोगामी विचारांबाबत सतत अस्वस्थ व्यक्ती), कोम्प्रोमात आदी शब्द स्पर्धेत होते.