काश्मीरवर संयुक्त राष्ट्राच्या ज्या अहवालाचा भारताने विरोध केला होता. त्यावरून आता मोठा खुलासा समोर आला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने (यूएनएचआरसी) प्रसिद्ध केलेल्या अहवालामागे एका पाकिस्तानी व्यक्तीचा हात होता. यूएनएचसीआरचे राजदूत झैद राद हे काश्मीरवर अहवाल तयार करताना पूर्ण वेळ आपण त्यांच्या संपर्कात होतो, असे कॅनडात राहणाऱ्या पाकिस्तीने व्यक्तीने स्वत:च कबूल केले आहे.

‘एएनआय’च्या वृत्तानुसार टोरँटो येथे राहणारे जफर बंगाश हे पत्रकार आणि इमाम आहेत. बंगाश यांनी काश्मीर मुद्यावर आयोजित एका परिषदेत याबाबत हे वक्तव्य केले. ते म्हणाले, मी तुम्हाला सांगू शकतो की, मी  अभिमानाने सांगू इच्छितो की, आमच्या काश्मीरच्या मित्राचा हा अहवाल तयार करण्यामागे मुख्य भूमिका होती. इतकेच काय मी स्वत: यूएनएचसीआरच्या राजदुतांच्या संपर्कात होतो. मी ई-मेलवर त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामध्ये त्यांनी माझ्या वैयक्तिक ई-मेललाही उत्तरे दिली होती. ते एलओसीच्या दोन्ही बाजूला जाऊ इच्छित होते. याचाच अर्थ असा की, स्वतंत्र काश्मीर आणि भारतद्वारा अधिकृत काश्मीर, असा होतो.

बंगाश पुढे म्हणाले, मी पाकिस्तानमधील विदेश मंत्रालयातील प्रवक्त्या नाफेस जकारियांशी चर्चा केल्यानंतर झैद राद यांना उत्तर दिले. जकारियांनी राद यांना आश्वासन दिले की पाकिस्तानमध्ये यूएनचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले जाईल. स्वतंत्र काश्मीरच्या दौऱ्याची व्यवस्थाही केली जाईल. यावेळी यूएन अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावेळी पीओकेचे अध्यक्ष सरदार मसूद खानही उपस्थित होते.

दरम्यान, १४ जून रोजी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेला अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित तसेच पक्षपातीपणाने आणि द्वेष भावनेतून तयार केल्याचा आरोप भारताने केला होता. भारताने हा अहवाल फेटाळाला होता. या अहवालात काश्मीरमध्ये भारत सरकारकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते.