वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याला मलेशिया सरकारने नोटीस पाठवली आहे. तसेच त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. झाकीर नाईक हा गेल्या तीन वर्षांपासून मलेशियामध्ये वास्तव्य करत आहे. दरम्यान, त्याच्या वादग्रस्त भाषणांमुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.

झाकीर नाईक आणि काही अन्य लोकांवर लोकांच्या भावना भडकावणारी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप आहे. दरम्यान, नाईक आणि अन्य लोकांची खोटी माहिती पसरवण्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मलेशियाचे गृहमंत्री मुहिद्दीन यासिन यांनी दिली. नाईक व्यतिरिक्त डोंग जोंग यालाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पोलिसांनी काही अन्य व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावली आहे. त्यांच्यापैकी काही जणांवर नजर ठेवण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात ठोस पुरावे आढळल्यास त्यांच्याविरोधात कलम 504 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मलेशियाचे मनुष्यबळ विकासमंत्री एम. कुलसेगरन यांनी नाईक मलेशियामध्ये भारतीयांविरोधात कथित प्रकारे करत असलेल्या वक्तव्यांचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. मलेशियामध्ये वास्तव्यास असलेले हिंदू धर्मिय नागरिक मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती अधिक निष्ठावान असल्याचे नाईक म्हणाला होता. मलेशियातील अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार झाकीर नाईकला नाही. झाकीर नाईक हा पलायन करून बाहेरून आला आहे. त्याला मलेशियाच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती आहे. तो मलेशियाचा नागरिक नाही. यामुळे त्याने मलेशियातील हिंदू समुदायावर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.