रेल्वेत बसलेले प्रवासी लवकरच  गुन्ह्य़ासंदर्भात झीरो एफआयआर दाखल करू शकतील व त्याची चौकशी रेल्वे पोलिस दलाचे सदस्य तातडीने सुरू करतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महिलांची छळवणूक, चोरी, दरोडे यांबाबतच्या तक्रारी मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून घेण्यास मध्य प्रदेशातील पथदर्शक प्रकल्पात सुरुवात करण्यात आली असून त्याची पुनरावृत्ती सगळ्या देशात केली जाणार आहे. आता प्रवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढचे स्थानक येण्याची वाट पाहावी लागणार नाही. ते मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून  तक्रार नोंदवू शकतील, त्यानंतर लगेच रेल्वे पोलिस त्याची चौकशी सुरू करतील. अशी माहिती रेल्वे पोलिस दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. या तक्रारीला झीरो एफआयआर म्हटले जाते. त्यात लगेच चौकशी सुरू केली जाईल. ज्या हद्दीत गुन्हा घडला तेथे तक्रार दाखल न करता दुसरीकडे कुठेही दाखल केलेली तक्रार ही झीरो एफआयआर गणली जाते ती नोंदवून घेतल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनकडे पाठवली जाते. यात पोलिस हद्दीचा वाद आणू शकत नाहीत, सध्या काही गुन्हा घडला तर रेल्वे प्रवाशांना एक तक्रारअर्ज भरावा लागतो. तो पुढच्या स्थानकावरील रेल्वे पोलिसांना सादर करावा  लागतो. नंतर त्या अर्जाचे प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे एफआयआरमध्ये रूपांतर होते. त्यामुळे अनेकदा रेल्वे गाडय़ांना विलंब तर होतोच पण तक्रारीची तडही लागत नाही. रेल्वेच्या उपयोजनावर रेल्वे पोलिस व टीटीई, ट्रेन कंडक्टर यांचाही समावेश आहे. या उपयोजनात धोक्याची सूचना देणारे बटन असून संकटातील महिला त्याचा वापर करू शकतात. गेल्या १४ डिसेंबरला गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रेल्वेला प्रवाशांच्या तक्रारीची दखल धावत्या रेल्वेतच  घेण्यासाठी उपयोजनाची सुविधा देण्यास सांगितले होते. या उपयोजनावर (अ‍ॅप) तुम्ही ऑफलाइन तक्रारही करू शकता.