पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास तसेच सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, तर अजिबात खपवून घेणार नाही असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून पर्यंत पाकिस्तानने २,५४२ वेळा शस्त्रसंधी मोडली आहे. काल पाकिस्तानने राजौरीच्या नौशेरा आणि पूँछच्या सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानला लागून असलेल्या १९८ किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील फॉरवर्ड भागांना आज लष्करप्रमुखांनी भेट दिली.

जम्मूमधील सैन्य तैनातीचा, सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी फिल्ड कमांडर्स आणि सैनिकांशी संवाद साधला. फॉरवर्ड भागात येणाऱ्या गुरजला त्यांनी भेट दिली. त्यावेळी मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लष्करप्रमुखांनी पश्चिम कमांडच्या सर्व रँकच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले आणि सैन्याचे मनोबल उंचावले. “आपल्या देशाच्या शत्रुंनी कुठलीही आगळीक केल्यास त्यांचा हल्ला उधळून लावण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सक्षम असून लष्कर कुठलीही परिस्थिती लष्कर हाताळू शकते” असा विश्वासही लष्करप्रमुखांनी व्यक्त केला.

जम्मू येथे दाखल झाल्यानंतर लष्करप्रमुख टायगर डिविजन येथे गेले. तिथून ते हेलिकॉप्टरने फॉरवर्ड भागांमध्ये गेले. जम्मूमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तानला लागून आहे. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय सीमेची जबाबदारी बीएसएफकडे आहे तर पाकिस्तानच्या बाजूला रेंजर्स ही सीमा संभाळतात. लष्करप्रमुख नरवणे आज पठाणकोटलाही भेट देणार आहेत अशी माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.