देशात चार दिवसांत १ लाख नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्लीत काल (शुक्रवारी) मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने देशातील एकूण बाधित रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी ८ लाखांचा आकडा पार केला. तर आजवर सुमारे २२,००० करोनाबाधित रुग्णांचे देशभरात मृत्यू झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या ७,९३,८०२ होती. मात्र, त्यानंतर दिवसभरातील विविध राज्यांमधील नव्या केसेसची आकडेवारी समोर आल्यानंतर हा आकडा ८ लाखांच्या पार पोहोचला. यानंतर शनिवारी आरोग्य विभागाने नवी आकडेवीर जाहीर केल्यानंतर या आणखी भर पडणार आहे.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री शुक्रवारी म्हणाले, “करोनाबाधित रुग्णांचा राष्ट्रीय मृत्यूदर २.७२ टक्क्यांपर्यंत खाली आहे. तर या सरासरीपेक्षा ३० राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यूदर यापेक्षा कमी आहे. त्याचबरोबर करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं देशाचं एकूण प्रमाण आता ६२.४२ टक्के इतकं झालं आहे. तर १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण यापेक्षा अधिक आहे.