देशात करोना विषाणूचं संसर्ग वेगानं वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली, तर अमेरिका व ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतात मागील १६ दिवसांतच १० लाख रुग्ण आढळून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझीलमध्ये करोना रुग्णांची संख्या २० लाखांहून ३० लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी २३ दिवसांचा कालावधी लागला होता. तर दुसरीकडे अमेरिकेतही रुग्णसंख्या २० लाखांहून ३० लाख होण्यासाठी २८ दिवस लागले होते. हे दोन्ही देश जगात सर्वोधिक करोना रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत सर्वात वर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे.

दोन्ही देशांची तुलना केली, तर भारतातील रुग्णसंख्या २० लाखांहून ३० लाखांवर पोहोचण्यासाठी फक्त १६ दिवसच लागले आहेत. या आकडेवारीवरून भारतातील करोना रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याचं समोर आलं आहे. भारतात रुग्णांची संख्या १० लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप लागला होता. १३८ दिवसानंतर भारतातील रुग्णसंख्या १० लाखांपर्यंत गेली होती. अमेरिकेत ९८ दिवसांतच १० लाख रुग्ण आढळून आले होते. तर ब्राझीलमध्ये ११४ दिवसांमध्ये रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली होती.

१० लाख रुग्णसंख्येनंतर भारतातील रुग्णसंख्येचा वेग वाढला. २१ दिवसात रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाखांवर पोहोचली. दुसरीकडे अमेरिकेत ४३ दिवस, तर ब्राझीलमध्ये २७ दिवसांच्या कालावधीनंतर इतके रुग्ण आढळून आले होते. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची तुलना केल्यास भारतात दोन्ही देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. ३० लाख रुग्णसंख्या असताना अमेरिकेत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तर ब्राझीलमध्येही १ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 lakh coronavirus cases cross in 16 days bmh
First published on: 22-08-2020 at 15:34 IST