नवी दिल्ली :उत्तराखंडमध्ये पर्वतरांगा असलेल्या भागांत मंगळवारी मोठय़ा प्रमाणात हिमस्खलन झाले. त्यात १० प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तर ११ जण बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली आहे.

उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री भागात ‘द्रौपदी का दांडा-२’ येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या २९ जणांना हिमस्खलनाचा फटका बसला. हिमस्खलनामुळे २९ गिर्यारोहकांचा गट बेपत्ता झाल्याचे कळताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले. त्यात आठ जणांना वाचविण्यात यश आले, तर १० प्रशिक्षणार्थी गियोरोहकांचे मृतदेह सापडले. अजूनही ११ जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याचे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. वाचविण्यात आलेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कुमार म्हणाले.

हे गिर्यारोहक एका स्थानिक गिर्यारोहण संस्थेत प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षणाचा भाग म्हणून ते गंगोत्री भागांत गिर्यारोहणासाठी गेले होते. उत्तराखंडचे निवडणूक अधिकारी पुष्करसिंह धामी यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि लष्कराने बचावकार्यात मदत करण्यासाठी पथके तैनात केली आहेत. भारतीय वायुसेनेने बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. ‘‘भारतीय गिर्यारोहणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांचा हिमस्खलनात मृत्यू झाला आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण महासंघाचे अधिकारी अमित चौधरी यांनी सांगितले.

अनेकांचा बळी घेणाऱ्या उत्तराखंडमधील हिमस्खलनाच्या बातम्या दु:खदायक आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून शोक व्यक्त करतो. बेपत्ता झालेल्यांनी सुखरूप परत येण्यासाठी आणि जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

राहुल गांधी, काँग्रेस नेते

हिमस्खलनात झालेल्या जीवितहानीमुळे खूप वेदना झाल्या आहेत.  ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा शोकसंतप्त कुटुंबांप्रति मी शोक व्यक्त करतो.

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरकाशी येथील हिमस्खलनाची घटना अत्यंत दु:खद आहे. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन, राज्य आपत्कालीन दल, राष्ट्रीय आपत्कालीन दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस आणि लष्कराचे पथक तातडीने बचावकार्यात गुंतले आहेत.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री