जम्मू-काश्मीर खोऱ्यात काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत असताना, एक मोठी माहिती समोर आली आहे. मागील पाच दिवसांत जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. शिवाय, आज जवानांनी लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा देखील खात्मा केला आहे.

पाकिस्तानमधील असलेल्या लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. तर, आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवासी असून, त्याची चौकशी सुरू आहे. अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे.

याशिवाय या वर्षात आतापर्यंत ७५ यशस्वी मोहिमा राबवल्या गेल्या, ज्यामध्ये १८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्वतंत्रपणे, १३८ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यावर्षी जवानांनी राबवलेल्या यशस्वी मोहिमांनी एक विक्रम प्रस्थापित केला असल्याची देखील माहिती डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे.

आज श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत पाकिस्तानचा रहिवासी असलेला लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला व पुलवामा येथील इरशाद या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.