Air India Pilots Mass Leave: अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १२ जून रोजी लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या एआय-१७१ ड्रिमलायनर विमानाचा अवघ्या ३० सेकंदात अपघात झाला होता. या अपघातात २६० लोक मृत्यूमुखी पडले. सदर अपघातानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे सुट्ट्या टाकण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. संसदेत यासंबंधी प्रश्न विचारला असता नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली.

१२ जून रोजी एअर इंडिया विमानाचा अपघात झाल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे १६ जून रोजी ११२ वैमानिकांनी आजारपणाची सुट्टी टाकली होती. यामध्ये ५१ कमांडरचा समावेश होता, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले. विमान अपघातानंतर एअर इंडियाचे कर्मचारी सुट्ट्यांवर जात आहेत का? असा प्रश्न विचारला असता मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये किंचित वाढ झालेली आहे. पण १६ जून रोजी सर्वांधिक ११२ वैमानिकांनी सुट्टी टाकली होती.

१२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतले होते. मात्र काही सेकंदातच विमान जवळच असलेल्या मेघाणी नगर भागात कोसळले. या भागातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन विमान आदळले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला. तर ज्याठिकाणी विमान कोसळले तेथील १९ जणांचा मृत्यू झाला.

विमानातील ११ए या सीटवर बसलेले प्रवासी विश्वासकुमार रमेश हे मात्र चमत्कारिकरित्या अपघातामधून बचावले.

एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, वैमानिकांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मोहोळ यांनी लोकसभेत माहिती देत असताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) फेब्रुवारी २०२३ प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाबाबत माहिती दिली. या परिपत्रकानुसार, फ्लाइट क्रू आणि एअर ट्राफिक कंट्रोलर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम बनविण्याची शिफारस यात करण्यात आली होती. मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखणे आणि त्या सोडविण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय एका वेगळ्या प्रश्नासंदर्भात माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, विमान कोसळल्यानंतर जमिनीवरील एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाची कोणतीही तरतूद नाही.