पीटीआय, श्रीनगर

दहशतवाद्यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर येथे गर्दीच्या बाजारपेठेजवळ सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड फेकला, त्यामध्ये किमान १२ नागरिक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दलांनी श्रीनगरच्या खन्यार भागामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या आघाडीच्या पाकिस्तानी कमांडरला ठार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. श्रीनगरमध्ये गेल्या दोन वर्षांमधील हा पहिलाच ग्रेनेड हल्ला आहे.

रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणापासून आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र असलेले संकुल तसेच पर्यटक स्वागत केंद्र (टीआरसी) जवळच आहेत. हा रेसिडन्सी रोड भाग टीआरसी ते लाल चौक या भागाला जोडतो. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात असते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, दहशतवाद्यांनी टीआरसीजवळील सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेडहल्ला केला. मात्र, ग्रेनेडचा नेम चुकला आणि तो रस्त्याच्या कडेला पडला. त्याच्या स्फोटात १२ नागरिक जखमी झाले. त्यामध्ये दोन महिला आणि चार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>अमेरिकेतील प्रचार अखेरच्या टप्प्यात, कमला हॅरिस लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात ; ट्रम्प यांचा उत्तर कॅरोलिनावर भर

दरम्यान, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आणि जम्मू-काश्मीर काँग्रेसने या हल्ल्याचा निषेध केला आहे. नागरिकांवरील हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी शक्य ते सर्व उपाय केले पाहिजेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा दले सतर्क

हल्ल्याच्या ठिकाणी जम्मू-काश्मीर पोलीस, निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकांनी घेराबंदी केली आणि तपासकार्याला सुरुवात केली. या घटनेनंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलीन प्रभात यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि दहशतवाद्यांना प्रभावी व जोरदार प्रत्युत्तर देण्यास सांगितले.