गोलाघाट, जोरहाट (आसाम) : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी कोळसा वाहून नेत असलेला मालवाहू ट्रक आणि प्रवासी बसच्या अपघातात तीन मुलांसह १२ जण मृत्युमुखी पडले. तर ३८ जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गोलाघाटचे जिल्हा आयुक्त पी. उदय प्रवीण यांनी सांगितले, की राष्ट्रीय महामार्ग ७१५ वर डेरगावजवळील बालीजान येथे हा अपघात झाला. ४९ प्रवासी घेऊन जाणारी बस या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ मृतांपैकी सहा महिला आहेत. हे सर्वजण बासा भरलुवा गावातील रहिवासी होते. जिल्हा आयुक्तांनी सांगितले की, एकूण ३१ जखमींवर जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जेएमसीएच) उपचार सुरू आहेत, अन्य इतर किरकोळ जखमींना डेरगाव येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> आकाराने लहान असले तरी लक्षद्वीपचे हृदय मात्र विशाल!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि परिवहन मंत्री परिमल शुक्लवैद्य यांनीही अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शुक्लवैद्य यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यांच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोलाघाट जिल्ह्यातील अपघातस्थळी पोहोचून सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले. ते म्हणाले, या रस्त्यावर इशारा देणारे फलक होते की नाही हे तपासात उघड होईल. आम्ही आवश्यक ती पावले उचलू आणि आवश्यकतेनुसार जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल करू. जिल्हा आयुक्त प्रवीण यांनी सांगितले, की या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही वाहनांच्या चालकांचा मृत्यू झाल्याने अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपासानंतरच सर्व तपशील समजू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की आसामच्या गोलाघाट येथे झालेल्या  अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर प्रसृत केले, की आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या रस्ते अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे खूप दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, ही सदिच्छा. स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहे.