Crime News : पश्चिम बंगालमधील पंसकुरा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षांच्या विद्यार्थ्याने चोरीचा आरोप झाल्याने स्वत:चं जीवन संपल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या १२ वर्षांच्या मुलावर एका दुकानातून चिप्सचे पॅकेट चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच दुकानदाराने त्याला सर्वांसमोर उठ बस करायला लावले होते. हा अपमान सहन न झाल्याने त्याने हे टोकचं पाऊल उचलल्याची माहिती शुक्रवारी पोलीस अधिकार्यांनी दिली आहे.
कृष्णेंदु दास असं मुलाचं नाव होतं. गुरूवारी सायंकाळी पंसकुरा भागातील गोसाईबेर बाजारात सातवीत शिकणाऱ्या मुलाने दुकानदार शुभंकर दीक्षित न दिसल्याने त्यांच्या दुकानातून चिप्सचं एक पॅकेट उचलल्याचा आरोप आहे. त्याने “काका, मी चिप्स विकत घेईन” असं ओरडून सांगितलं, पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो दुकानातून चिप्सचे एक पॅकेट घेऊन निघून गेला, असे अधिकाऱ्याने त्याच्या आईच्या हवाल्याने सांगितले.
पण त्यानंतर लगेचच परतलेल्या दुकानदार दिक्षित यांनी त्याचा पाठलाग केला, त्याच्या कानशिलात लगावली आणि सर्वांसमोर उठ बस करायला लावली, अशी माहिती एका अधिकाऱ्यांने कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे दिली. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर दासच्या आईला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं, तेव्हा त्याची आई देखील त्याच्यावर ओरडली आणि त्याला चापट मारली. यासगळ्यात मुलाने मात्र दावा केला की चिप्सचं पाकिट हे दुकानासमोर पडलेलं होतं आणि त्याने नंतर पैसे दिले असते. इतकेच नाही तर दुकानदाराची परवानगी न घेता पॅकेट घेतल्याबद्दल त्याने लगेच पैसे देण्याची आणि माफी मागण्याची तयारीही दाखवली, पण दुकानदाराने त्याच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला.
त्यानंतर चिडलेला कृष्णेंदु त्याच्या आईबरोबर घरी आला आणि त्याने त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि दार उघडले नाही. थोड्या वेळानंतर आईने शेजाऱ्यांबरोबर मिळून दरवाजा मोडून काढला मात्र त्यांना मुलगा मृत अवस्थेत आढळून आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी या १२ वर्षांच्या मुलाने बंगाली भाषेत लिहिलेली चिठ्ठी त्याच्या बाजूला पडलेली आढळून आली.
“आई, मी चोर नाही. मी चोरी केली नाही. मी वाट पाहिली पण अंकल (दुकानदार) तेथे नव्हते. परत येताना मला कुरकुरेचं पॅकेट रोडवर पडलेलं दिसलं आणि मी ते उचललं. मला कुरकरे खूप आवडतात,” असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. कृष्णेंदु याने पुढे लिहिलं होतं की, “निघून जाण्यापूर्वी हे माझे शेवटचे शब्द आहेत.” त्याला तात्काळ तामलुक रुग्णालयात नेण्यात आले आणि आयसीयूमध्ये भरती करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार हा नागरी स्वयंसेवक असून बंगाल पोलिसांना ट्राफिक मॅनेजमेंटमध्ये मदत करतो. त्याने सुरूवातीला आपण मुलाला मारहाण केली नसल्याचा दावा केला. पण या घटनेबद्दल सर्वांना कळल्यानंतर त्याच्या बंद केलेल्या दुकानाबाहेर गर्दी जमू लागली, यादरम्यान तो दुकानदार मात्र आढळून आला नाही.