नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट) विशेषोपचार समुपदेशनाची तिसरी फेरी आयोजित करण्याचे आणि आपल्याला त्यात सहभागी होण्याची परवानगी देण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकेल व आपल्या पसंतीचे अभ्यासक्रम निवडता येतील अशी विनंती करणारी याचिका १३ डॉक्टरांनी केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह इतरांना नोटीस जारी केली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या नीट- विशेषोपचार २०२३-२४ प्रवेश परीक्षेतील अखिल भारतीय कोटय़ासाठी आपण पात्र ठरल्यानंतर, समुपदेशनाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीनंतर आपल्याला विविध विशेषोपचार अभ्यासक्रमांमधील जागा देण्यात आल्या आहेत, असे सांगणाऱ्या या डॉक्टरांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे न्या. बी.आर. गवई व न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने मान्य केले. केंद्र सरकार, दिल्ली येथील अ.भा. आयुर्विज्ञान संस्था व राष्ट्रीय वैद्यक आयोग यांच्यासह इतरांना याचिकेवर उत्तर सादर करण्यास सांगून खंडपीठाने याचिका सोमवारी सुनावणीसाठी ठेवली.