scorecardresearch

१४ कोटी रोख, एक कोटींचे दागिने अन् करोडोंच्या महागड्या गाड्या; BSF अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ

BSF अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ; १२५ कोटींचा घोटाळा उघड

BSF, Border Security Force, Car,
BSF अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ; १२५ कोटींचा घोटाळा उघड

हरियाणामधील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ माजली आहे. या अधिकाऱ्याकडे तब्बल १४ कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या सापडल्या आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे. बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट असणारे प्रवीण यादव गुरुग्राम येथील मानेसरमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयात कार्यरत होते. आयपीएस अधिकारी असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करत १२५ कोटींची मालमत्ता त्यांनी जमा केली होती. पोलिसांनी या अधिकाऱ्याला अटक केली आहे.

गुरुग्राम पोलिसांनी अधिकाऱ्यासोबत त्यांची पत्नी ममता यादव, बहिण रितू आणि सहकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत प्रवीण यादव यांनी लोकांना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या परिसरात बांधकामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन देत कोट्यावधी रुपये घेतले होते.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “त्याने हे सर्व पैसे एनएसजीच्या नावे सुरु केलेल्या खोट्या खात्यात जमा केले होते. हे खातं त्याची बहिण रितू यादवने उघडलं होतं. रितू यादव अॅक्सिस बँकेत मॅनेजर आहे”.

“प्रवीण यादवला शेअर बाजारात ६० लाखांचं नुकसान झालं होतं. त्याने लोकांची फसवणूक करत हा सगळा पैसा मिळवण्याचा कट आखला होता,” अशी माहिती गुरुग्राम पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त (क्राइम) प्रीतपाल सिंग यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यादव यांना अगरताला येथे पोस्टिंग मिळाली होती. पण त्यांनी इतकी संपत्ती जमा केली होती की, काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 crores luxury cars seized from bsf officer behind 125 crore fraud sgy