15 August Independence day : १५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप खास असतो. कारण ७८ वर्षांपूर्वी याच दिवशी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. भारतीयांनी एकत्र येत इंग्रजांना देश सोडून जायला भाग पाडलं आणि १४ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज भारतातून निघून गेले. तेव्हापासून आपण दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र, १५ ऑगस्ट या दिवशी एकट्या भारताचा स्वातंत्र्य दिन नाही. या दिवशी जगभरातील इतरही काही देश त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

भारतासह दक्षिण व उत्तर कोरिया, काँगोचे प्रजासत्ताक, लिक्टेनस्टीन व बाहरीन या देशांसाठी १५ ऑगस्ट हा खास दिवस आहे.

भारत

१४ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांची भारतातील जुलमी राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट रोजी भारतीयांनी औपचारिकपणे या देशाचा कारभार आपल्या हाती घेतला. गेल्या ७८ वर्षांपासून आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत. या दिवशी ठिकठिकाणी ध्वजारोहण सोहळे, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया हा देश १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या तावडीतून मुक्त झाला. द्वितीय विश्वयुद्धात अमेरिकेने जपानवर अणूबॉम्ब टाकल्यानंतर जपानने मित्र राष्ट्रांसमोर गुडघे टेकले. त्याचबरोबर त्यांनी कोरियामधूनही (उत्तर व दक्षिण कोरिया) काढता पाय घेतला. तेव्हापासून दक्षिण कोरियाई जनता १५ ऑगस्ट रोजी ‘ग्वांगबोकजोल’ साजरा करते. राजधानी सिओलसह दक्षिण कोरियात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व परेड आयोजित केल्या जातात.

उत्तर कोरिया

याच दिवशी उत्तर कोरियात ”जो गुके बांग’ हा दिवस साजरा केला जातो.

काँगोचे प्रजासत्ताक (काँगो)

आफ्रिकेतील काँगो हे राष्ट्र १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रेंचापासून स्वतंत्र झाले. आज हा देश त्यांचा ६५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे.

लिक्टेनस्टीन

लिक्टेनस्टीनमधील जनता १५ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करते. आजच्या दिवशी १९४० रोजी हा युरोपातील छोटासा देश जर्मन महासंघापासून स्वतंत्र झाला होता.

बाहरीन

१४ ऑगस्ट १९७१ रोजी बाहरीनमधील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट रोजी या देशाने ते स्वतंत्र असल्याची घोषणा केली. हा देश १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला असला तरी येथील जनता १६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिन साजरा करते.