मध्य प्रदेशातील भिंडमध्ये १५० वर्ष जुन्या कारागृहाची भिंत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २२ कैदी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात बराक क्रमांक ७ वर ही भिंत कोसळली आहे. त्यामुळे तो कारागृह बराक पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. अपघाताच्या वेळी ६४ कैदी बराकमध्ये होते. त्यापैकी २२ जण गंभीर जखमी झाले आहेत

भिंड येथील कारागृहात अपघाताच्या वेळी एकूण २५५ कैदी होते. या अपघातात २२ कैदी जखमी झाले असून त्यापैकी दोन कैद्यांची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही कैद्यांना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात बांधकाम विभागाचा निष्काळजीपणही समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

कारागृह अधिक्षक ओपी पांडे यांनी सांगितले की हा अपघात पहाटे ५:१० वाजता घडला. एका कॉन्स्टेबलने बराक क्रमांक ७ चे प्लास्टर पडत असल्याचे पाहिले. त्याने लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना गोळा केले. बराक उघडण्याची सुरुवात करताच ते पूर्णपणे कोसळले. यानंतर बराक क्रमांक २ च्या भिंतीही कोसळल्या. भिंती कोसळल्याने २२ कैदी त्याखाली दबले गेले. त्यानंतर बाकीच्या कैद्यांना बराक क्रमांक ८ मध्ये हलवण्यात आले. अपघाताच्या वेळी बराक क्रमांक ७ मध्ये ६४ कैदी होते, तर कारागृहात एकूण २५५ कैदी आहेत.

बांधकाम विभागाला ४ दिवसांपूर्वी पत्र लिहिले

कारागृह अधिक्षकांनी सांगितले की तुरुंगात काही दिवस पाणी गळत होते. चार दिवसांपूर्वी बांधकाम विभागाला त्याच्या दुरुस्तीसाठी पत्रही लिहिले होते. पण, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ते म्हणाले की, कारागृहात अशा प्रकारची दुरुस्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. कारागृह अधिक्षकांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारागृहाच्या जागी नवीन कारागृह प्रस्तावित करण्यात आले होते. २००८ पासून नवीन कारागृह बांधले जात आहे. २०१८ पर्यंत ते तयार व्हायचे होते, परंतु ते अद्याप झाले नाही.