नवी दिल्ली : भारतात करोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारी १५४ झाली असून विविध भागात सतरा नवीन रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या रुग्णांमध्ये २५ परदेशी नागरिक असून आतापर्यंत दिल्ली, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रत्येकी एक बळी गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५७०० लोकांवर देखरेख केली जात आहे. दिल्लीत दहा रुग्ण सापडले असून त्यात एक परदेशी नागरिक आहे. उत्तर प्रदेशात एकूण १६ रुग्ण असून त्यात एक परदेशी नागरिक आहे. महाराष्ट्रात ४५ रुग्ण असून त्यात तीन परदेशी नागरिक आहेत. केरळात २७ रुग्ण असून त्यात दोन परदेशी नागरिक आहेत.

कर्नाटकात ११ रुग्ण असून लडाखमध्ये आठ, जम्मू काश्मीरमध्ये तीन तर तेलंगणात सहा रुग्ण आहेत. तेलंगणातील रुग्णात दोन परदेशी नागरिक आहेत. राजस्थानात चार रुग्ण असून त्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. हरयाणात १७ रुग्ण असून त्यात१४ परदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात तीन जण केरळातील आहेत. देशात करोनाने तीन बळी आतापर्यंत घेतले असून कर्नाटकात कलबुर्गी येथे ७६ वर्षांच्या सौदी अरेबियातून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दिल्लीत एका वृद्धेचा, तर मुंबईत दुबईस प्रवास करून आलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सरकारने अफगाणिस्तान, फिलिपाइन्स व मलेशियातून येणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी बंदी घातली आहे. ३१ मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. तुर्कस्तान, ब्रिटन, युरोपीय देशातून येणाऱ्या प्रवाशांवर १८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान बंदी घालण्यात आली आहे.

वैष्णोदेवी यात्रा बंद

जम्मू : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा बंद केली असून आंतर राज्य बससेवा बंद केली आहे. श्रीमाता वैष्णोदेवी यात्रा ही आजपासून बंद करण्यात येत असून आंतरराज्य बस बंद केल्या आहेत, त्यामुळे जम्मू-काश्मीरमधून कुठल्याही बस येणार जाणार नाहीत, असे जम्मू-काश्मीरचे माहिती व जनसंपर्क संचालक यांनी म्हटले आहे. उधमपूर येथील जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बस सेवा तसेच जम्मूतील बाग ए बहू व पूँछ जिल्ह्य़ातील सार्वजनिक उद्याने पुढील आदेश मिळेपर्यंत बंद केली आहेत.

परदेशात २७६ भारतीय रुग्ण

नवी दिल्ली : परदेशात एकूण २७६ भारतीयांना करोनाचा संसर्ग झालेला असून त्यात इराणमधील २५५ भारतीयांचा समावेश आहे,अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. यात संयुक्त अरब अमिरातीत १२ तर इटलीत पाच रुग्ण आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे,  परदेशातील करोनाग्रस्त भारतीयांची संख्या २७६ असून  त्यात इराण २५५, अमिरात १२, इटली ५, हाँगकाँग, कुवेत, रवांडा, श्रीलंका या देशात प्रत्येकी एक याप्रमाणे संख्या आहे. इराणमध्ये सहा हजार भारतीय वास्तव्यास असून त्यातील २५५ जणांना लागण झाली आहे. भारतातून ११०० यात्रेकरून इराणला गेले होते. केंद्राने इराणमध्ये अडकून पडलेल्या रुग्णांबाबत काय केले असे विचारले असता त्यांनी म्हटले आहे, भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था  करण्यात आली आहे. इराणमध्ये सहा भारतीय आरोग्य अधिकारी पाठवण्यात आले असून तेथे तपासणी सुविधा उभारण्यात येणार आहे. इराणमध्ये अडकून पडलेल्या १७०६ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 fresh cases reported from various parts of the country zws
First published on: 19-03-2020 at 02:49 IST