Microsoft 18 Employees Arrested : अमेरिकेतेली वॉशिंग्टनच्या रेडमंड भागात असेलेल्या मायक्रोसॉफ्ट मुख्यालयाच्या कॅम्पसमधून पोलिसांनी १८ जणांना अटक केल्याची घटना घडली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रेडमंड पोलीस विभागाने याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी हा प्रकार २० ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगितले आहे.
पोलीस विभागाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. “मायक्रोसॉफ्ट कॅम्पसमध्ये आंदोलनादरम्यान वेगवेगळ्या आरोपांखाली १८ जणांना अटक करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट कॅम्पसमध्ये होत असलेल्या निदर्शनाच्या ठिकाणी रेडमंड पोलीस हजर आहेत. २० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता रेडमंड अधिकाऱ्यांना मायक्रोसॉफ्टच्या परिससरात मोठी गर्दी केलेल्या आंदोलनकर्त्यांकडे पाठवण्यात आले,” असे पोलीस विभागाने म्हटले आहे.
पोलीसांनी पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, जेव्हा सुरूवातीला पोलिसांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलकांनी विरोध केला आणि ते आक्रमक झाले. “काही आंदोलकांनी मायक्रोसॉफ्टच्या चिन्हावर आणि जमिनीवर रंग ओतला होता,” असेही पोलिसांनी सांगितले.
या गोंधळादरम्यान काही आंदोलकांनी विक्रेत्यांकडून चोरलेल्या खुर्च्या आणि टेबल वापरून पादचारी पूल अडवला, असा दावाही पोलिसांनी केला आहे. त्यांनी फर्निचरचा वापर करून बॅरिकेड्स तयार केले होते.
“अधिकाऱ्यांनी अतिक्रमण करणे, दुर्भावनापूर्ण खोडसाळपणा करणे, अटकेला विरोध करणे आणि अडथळा आणणे यासारख्या विविध आरोपांखीली १८ जणांना ताब्यात घेतले. कोणतीही दुखापत झाल्याची नोंद नाही,” असेही पोलीस विभागाने पुढे सांगितले आहे. तसेच पोलिसांनी तीन फोटो देखील पोस्ट केले आहेत ज्यामध्ये एकामध्ये मायक्रोसॉफ्टच्या चिन्हावर रंग टाकण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
“आज एका गट परत आला आणि त्यांनी मोडतोड याबरोबरच मालमत्तेचे नुकसान केले,” असे मायक्रोसॉफटने त्यांच्या निवेदनात म्हटल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. “त्यांनी कर्मचाऱ्यासाठी असलेल्या लंचटाइम फार्मर्स मार्केटमधील स्थानिक लहान व्यावसायिकांनाही अडथळा आणला, त्यांना त्रास दिला आणि त्यांच्याकडून टेबल आणि तंबू घेऊन गेले,” असेही निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच मायक्रोसॉफटने सहकार्याबद्दल पोलिसांचे आभार देखील मानले.
कर्मचाऱ्यांचे आंदोलन कशासाठी होते?
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, हे कर्मचारी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इस्रायलबरोबरच्या व्यापारी संबंधांविरोधात आंदोलन करत होते. या आंदोलनाच्या पाठिशी असेला गट ‘No Azure for Apartheid’ याची मागणी आहे की कंपनीने त्यांची उत्पादने इस्रायलला विकणे बंद करावे. त्यांचा दावा आहे की या तंत्रज्ञानामुळे गाझा येथील हत्याकांडाला पाठबळ मिळत आहे.
मात्र मे महिन्यात करण्यात आलेल्या एका ब्लॉगपोस्टमध्ये मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले होते की, “मायक्रोसॉफ्टचे Azure आणि एआय तंत्रज्ञान हे गाझा येथील संघर्षात लोकांना लक्ष्य करणे किंवा इजा पोहचवण्यासाठी वापरले गेल्याचा कोणताही पुरावा आजवर आढळून आलेला नाही.”