Delhi Crime : दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील संजय वन परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या झाली आहे. तिच्याच मित्राने तिची हत्या केल्याचं तपासात उघड केलंय. दरम्यान, या हत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अर्शकृत सिंग असं आरोपीचं नाव आहे. इंडिया टीव्ही न्युजने यासंदर्भातील माहिती दिली.
हत्या झालेली तरुणी आणि आरोपी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगध्ये शिकत होते. रविवारी संबंधित तरुणी कॉलेजला जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडली, पण ती घरी परतलीच नाही. १ जून रोजी ती घराबाहेर पडली. त्यानंतर दुपारी १२ वाजता तिने आईला मेसेज करून लवकरच घरी येत असल्याचं कळवलं. पण त्यानंतरही ती परतली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तत्काळ शोध सुरू केला.
दरम्यान, सायंकाळी पीडित मुलीच्या आईला अर्शकृत सिंगच्या वडिलांचा फोन आला. अर्शकृतवर संजय वनमध्ये हल्ला झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, त्याच्यावर पितमपुरा येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही कळवलं. यानुसार, पीडित मुलीचे आई-वडील संजय वन परिसरात तिचा शोध घेण्याकरता गेले. मात्र, तरीही ती तिथे सापडली नाही. अखेर, आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहऱणाचा गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, अर्शकृतचीही पोलिसांनी चौकशी केली. या चौकशदरम्यान, त्याने हत्येची कबुली दिली.
चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितलं की, संजय वनमध्ये त्यानेच मुलीला भेटायला बोलावले होते. एका निर्जन स्थळी नेलं. तिथे तिच्यावर चाकूहल्ला केला. तिचा गळा दाबला आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यादरम्यान त्याच्याही हाताला दुखापत झाली, त्यामुळे तो रुग्णालयात गेला आणि त्याने त्याच्या कुटुंबियांना कळवलं.
मृतदेह सापडला, हत्येतील हत्यार जप्त
आरोपीच्या निर्देशानुसार पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले. हत्येत वापरलेला चाकू देखील जप्त करण्यात आला आहे. आता एफआयआरमध्ये खून आणि पुरावे नष्ट करण्याचे कलम जोडले गेले आहेत.
१८ वर्षीय अर्शकृत सिंग हा राणी बाग येथील रहिवासी आहे आणि दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये बी.कॉम.चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. या गुन्ह्यामागील हेतू आणि हा गुन्हा पूर्वनियोजित होता का याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.