अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील ओशन काउंटीमधील एका खाडीमध्ये एका बोटीची आणि एका मिंक व्हेल माशाची टक्कर झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तो मासा गतप्राण झाला आहे. या घटनेवेळी बोटीतील एक प्रवाशीही खाली समुद्रात फेकला गेला असून ही घटना शनिवारी घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, जेव्हा एका बोटीची आणि माशाची टक्कर होते, तेव्हा ही बोट जोरदार हालताना दिसत आहे. ही बोट पाण्यामध्ये उलटण्याची शक्यता होती, पण थोडक्यात वाचली. घटनेनंतर मासा खूपवेळ त्या ठिकाणी तडफडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र, त्यानंतर काही वेळाने तो मासा त्या ठिकाणाहून पोहोत पुढे गेला. पण नंतर त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त सीबीएस न्यूजच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दरम्यान, सागरी प्राण्यांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी असलेले केंद्र म्हणजे मरीन मॅमल स्ट्रँडिंग सेंटरच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत सांगितलं की, शनिवारी दुपारी २.४५ वाजता न्यू जर्सी बार्नेगट खाडीत एक व्हेल मासा दिसल्यानंतर सतर्क करण्यात आलं होतं. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी यूएस कोस्ट गार्ड, एनजेएसपी मरीन युनिट आणि सी टो यांच्याशी समन्वय साधला आणि घटनास्थळी एका समन्वयकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं होतं.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोटीतून खाली पडलेल्या व्यक्तीला कोणहीती गंभीर इजा झालेली नाही. या धडकेच्या घटनेनंतर माशावर लक्ष ठेवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळाने माशाचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या घटनेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Boater was thrown overboard in Barnegat Bay after a whale ? kept slamming into the vessel pic.twitter.com/zayvLv01J5
— Wake Up NJ ?? New Jersey (@wakeupnj) August 3, 2025
एका युजर्सने म्हटलं की,’अरेरे बिच्चारा देवमासा. ही घटना घडल्याचा मला राग आला आहे’, असं एकाने म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एकाने म्हटलं की, ‘अरे देवा, हे हृदयद्रावक आहे. तो मासा आणि तो प्रवासीही घाबरला असावा. अशा प्रकारचे अपघात सतत घडत राहणं ही एक शोकांतिका आहे. कदाचित बोटीच्या वेगाबाबत कठोर नियम केले तर? निसर्गाला असे त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहून खूप दुःख झालं, असं युजर्सने म्हटलं आहे.