अमेरिकेत २० वर्षीय भारतीय तरुणाला तिघांनी सात महिने डांबून ठेवलं होतं. हा विद्यार्थी भारतातून अमेरिकेतील मिसूर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये शिकण्यासाठी आला होता. पोलिसांनी त्याची सुटका केली तेव्हा त्याची हाडे फ्रॅक्चर झाली होती. तसंच शरीरावर जखमा होत्या. त्यामुळे त्याला सध्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून त्याला डांबून ठेवलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या भारतीय विद्यार्थ्याचे नाव गुलदस्त्यात आहे. परंतु, त्याला त्याच्या एका चुलत भावाने आणि दोघांनी सात महिन्यांहून अधिक काळ डांबून ठेवले होते, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे. पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिया टुडेने म्हटलं आहे की, एका स्थानिकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी सेंट चार्ल्स काऊंटीमधील ग्रामीण महामार्गावर असलेल्या एका घरात पोलिसांनी धाड टाकली. तेथून व्यंकटेश आर सत्तारू (३५), श्रावण वर्मा पेनुमेत्वा (२४) आणि निखिल वर्मा पेनमत्सा (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सत्तारू याने या विद्यार्थ्याला एप्रिल महिन्यापासून त्याच्या खोलीत डांबून ठेवलं होतं. त्याला स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. परंतु, त्याच्या पासपोर्टची विल्हेवाट लावण्यात आली. दिवसभराची सर्व कामे त्याच्याकडून करून घेतली जात होती. तसंच, सत्तारूच्या आयटी कंपनीतील कामेही या विद्यार्थ्याला करायला सांगितले होते. एवढंच नव्हे तर, सत्तारूने दोघांना त्याच्या घरी बोलावून या विद्यार्थ्याला मारपीट करायला लावली. या मारपीट दरम्यान विद्यार्थी जोरात किंचाळला नाही तर त्याला आणखी जोरात बडदायला सांगितलं जायचं. पीडित विद्यार्थ्याला शौचासही जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. तर, त्याला फरशीवर झोपवले जायचे.
पीडित विद्यार्थी केवळ तीन तासच झोपू शकत होता. तसंच, तो त्याच्या आईशीही संपर्क साधू शकत नव्हता. आईला व्हिडीओ कॉल करण्यासही मज्जाव करण्यात आला होता.
पीडित विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सत्तारु हा भारतातील एका श्रीमंत घराण्यातील मुलगा असून त्याचा राजकीय क्षेत्रातील लोकांशी संबंध आहे. ही अत्यंत अमानवीय आणि अविवेकी कृत्य असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सत्तारूची डिफिएन्स, डार्डेन प्रेरी आणि ओ फॉलॉन येथे घरे आहेत. तो ओ फॉलॉन येथे त्याच्या पत्नी आणि मुलांसह राहत होता. तर, या घटनेत आरोपी असलेले दोघेजण पीडिताला जिथे डांबून ठेवले होते, तिथे राहत होते. त्यामुळे, याप्रकरणी मानवी तस्करी अतंर्गत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.