उत्तर प्रदेशात सहकारी डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवांचा पुरता बोजवारा उडाला आहे, तर या हल्ल्याच्या निषेधार्थ २०० सरकारी डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील डॉक्टरांच्या संपाचा पाचवा दिवस होऊनही त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत असल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशननेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४८ तासांच्या आत डॉक्टरांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे.
आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी डॉक्टरांचा प्रश्न उचलून धरल्याने उत्तर प्रदेश सरकारची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. गेल्या दोन दिवसांत ५०० हून अधिक डॉक्टरांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून, दिल्लीत ‘एम्स’मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनीही संपकऱ्यांना पाठिंबा दर्शवीत काळ्या फिती लावून काम केले. त्यामुळे या पेचातून आता मार्ग कसा काढायचा, हाच अखिलेश यादव यांच्यासमोरील कळीचा प्रश्न झाला आहे.