गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील आरोपी अजमेरी अब्दूल रशिदला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून रियाधमधून परतल्यावर त्याला अटक करण्यात आली.

सप्टेंबर २००२ मध्ये गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३० जण ठार व ८० जण जखमी झाले होते. हल्ल्यात दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी एके ५६ रायफल्समधून गोळ्या झाडल्या होत्या व हातबॉम्ब फेकले होते. यानंतर एनएसजी कमांडोजनी हल्लेखोरांना ठार केले.

अक्षरधाम मंदिरातील हल्ल्यातील आरोपी अजमेरी अब्दूल रशिद हा फरार होता. रशिद हा रियाधमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली होती. शनिवारी सकाळी रशिद रियाधमधून भारतात परतला. अहमदाबाद विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.  या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमध्ये रशिदचा समावेश होता.

दरम्यान, मे २०१४ मध्ये अक्षरधाम मंदिरातील हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांसह सर्व सहा आरोपींना सुप्रीम कोर्टाने दोषमुक्त केले होते. यात रशिदचा भाऊ अजमेरी अदम याचाही समावेश होता. आरोपींची कबुलीपत्रे कायद्यानुसार अवैध असून आरोपींनी कटात सहभाग घेतल्याचा संशयातीत पुरावा देता आलेला नाही, असे नमूद करत कोर्टाने सर्वांना दोषमुक्त केले होते.