scorecardresearch

“२००४ ते २०१४ हे देशाच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक, कारण…” काँग्रेसचा मोदींकडून समाचार

जाणून घ्या लोकसभेतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं आहे?

Pm Modi Speech in Loksabha
"इंदिरा गांधींनी राज्य सरकारे पाडण्यासाठी ५० वेळा घटनेचा गैरवापर केला"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

आज जगभरातले अनेक देश कठीण काळातून जात आहेत. अशात आपला देश प्रगतीपथावर आहे सगळ्या जगात आपला देश चांगली कामगिरी करतो आहे. मात्र काही निराशावादी लोक हे आजही निराशेतच बुडाले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक होतं अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?

२००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. या दहा वर्षात महागाई डबल डिजिट झाली. त्यामुळेच काही चांगलं झालं की या लोकांची निराशा वाढते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली होती त्यांनी फक्त त्यासाठीचे कायदे तयार केले. बाकी काहीही केलं नाही. आम्ही बेरोजगारी दूर करण्यासाठी कायदा केला एवढं सांगितलं. २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं घोटाळ्यांचं दशक होतं.

देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशत पसरली होती

यूपीएची ती दहा वर्षे काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. अनोळखी वस्तूला हात लावू नका, आज इकडे स्फोट झाला, आज तिकडे स्फोट झाल्या अशाच बातम्या आल्या. २००४ ते २०१४ या कालावधीत हिंसाचाराचा कहर देशात माजला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला होता. यांच्या निराशेचं कारण हे देखील आहे की आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो आहे तेव्हा यांना वाईट वाटतं आहे.

या दशकात घोटाळे आणि हिंसा वाढली

आपला देश आधीही सामर्थ्यशाली होता. मात्र २००४ ते २०१४ हे दशक हे अत्यंत वाईट दशक होतं. प्रत्येक संधीला संकटात नेणारा तो काळ होता. टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे टूजी मध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले. भारताचं नाव या CWG घोटाळ्यांमुळे बदनाम झालं. जगात भारताची अब्रू गेली असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कोळसा घोटाळा चर्चेत आला. देशात एवढे अतिरेकी हल्ले झाले की विचारू नका. २००८ चा हल्ला आजही कुणीही विसरू शकत नाही. मात्र दहशतीला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत कुणामध्येच नव्हती. आपल्या देशातल्या निरपराध लोकांचं रक्त अकारण वाहिलं. २००४ ते २०१४ हे दशक देशातलं सर्वात वाईट दशक म्हणून ओळखलं जाईल. तर २०२३ चं दशक हे देशाला प्रगतीपथावर नेणारं दशक ठरलं आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 17:38 IST