दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात चारही दोषींची फाशी दिल्ली कोर्टाने कायम ठेवली आहे. काही वेळापूर्वीच दिल्ली कोर्टाने हा निकाल दिला. २२ जानेवारी ही तारीख या चौघांच्याही फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं दिल्ली कोर्टाने म्हटलं आहे. या चारही आरोपींना १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या मुलीला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांना दिली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातले आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह आणि पवन गुप्ता यांच्या डेथ वॉरंटवर सुनावणी झाली. या वेळी आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये शाब्दिक चकमक झाली असंही समजतं आहे. दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप निर्भयाच्या वकिलांनी केला. तर आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करायची आहे असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दरम्यान दिल्ली कोर्टाने काही वेळापूर्वीच या चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या आरोपींना फाशी देण्यात यावी असं दिल्ली कोर्टाने म्हटलं आहे.

आरोपींच्या वकिलांनी काय म्हटलं?

आम्ही आता सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करु अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनी दिली आहे.

निर्भयाच्या आईने काय म्हटलं?

“माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी इतके दिवस वाट पाहिली. या आरोपींना फाशीच व्हायला हवी हीच माझी मागणी होती. अखेर तिला न्याय मिळाला अशी भावना माझ्या मनात आहे. ”

काय आहे निर्भया प्रकरण?

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

काय असतं डेथ वॉरंट?

कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं की कोर्टाला फाशीची तारीख आणि वेळ जाहीर करावी लागते. तसेच मधला काही काळ हा आरोपींना त्यांच्या नातेवाईकांनी भेटावं म्हणून दिलेला असतो. तसंच काही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तरीही हा वेळ दिला जातो.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात हा अवधी फक्त १४ दिवसांचा देण्यात आला आहे. त्यामुळे या आरोपींची फाशी निश्चित मानली जाते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2012 delhi gangrape casea delhi court issues death warrant against all 4 convicts scj
First published on: 07-01-2020 at 16:53 IST