उद्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यफेरीचा पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ आठव्यांदा तर भारतीय संघ सातव्यांदा वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत पोहोचला आहे. या सामन्यात एक अजब योगायोग जुळून येणार आहे. २००८ साली मलेशियामध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ उपांत्यफेरीत आमने-सामने होते. त्यावेळी सुद्धा भारताच्या कर्णधारपदी विराट कोहली होता तर न्यूझीलंडची धुरा केन विल्यमसनच्या खांद्यावर होती.

उद्या सिनियर संघाचे कर्णधार म्हणून दोघेही पुन्हा एकदा उपांत्यफेरीत आमने-सामने येतील. आमच्या बॅचचे त्या वर्ल्डकपमधले बरेच खेळाडू आज आपआपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळत आहेत. माझ्या दृष्टीने ही खूप सुंदर आठवण आहे. त्यावेळी मी किंवा केन विल्यमसनने पुन्हा एकदिवस आम्ही वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत समोरासमोर येऊ असा विचार केला नव्हता असे विराट म्हणाला.

उद्या आम्ही जेव्हा भेटू तेव्हा मी त्याला याची आठवण करुन देईन असे कोहलीने सांगितले. २००८ साली कोहलीनेच त्या सामन्यामध्ये विल्यमसनची विकेट काढली होती. पुन्हा हे घडेल असे मला वाटत नाही असे कोहली म्हणाला.

उद्याच्या सामन्यात निर्णय खूप महत्वाचे असतील. उपांत्यफेरीसारखा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघांकडे पुरेसा अनुभव आहे. न्यूझीलंडचा संघ मागच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामुळे बादफेरीचा सामना कसा खेळायचा हे त्यांना ठाऊक आहे. हा वर्ल्डकप सुद्धा त्यांच्यासाठी चांगला ठरला. त्यामुळे ते उपांत्यफेरीपर्यंत पोहोचले असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने पत्रकार परिषदेला संबोधित केले. जो संघ जास्त शूर असेल त्यांना विजयाची संधी आहे. दोन्ही संघांना सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. जो संघ दबाव उत्तम हाताळेल तो अंतिम फेरीत पोहोचेल असे विराट म्हणाला.