‘सात समंदर पार मैं तेरे पिछे पिछे आ गई’, हे हिंदी गाण आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. किंवा त्याने तिच्यासाठी सात समुद्र पार केले अशा गोष्टीही ऐकल्या असतील. मात्र, असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमध्ये पहायला मिळाला. बांग्लादेशात राहणाऱ्या कृष्णा मंगल या २२ वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली. पण ती रेल्वे, विमान किंवा कोणत्या गाडीतून नाही आली. तर ती सुंदरबनच्या जंगलातून मार्ग काढत, नदीतून पोहत भारतात पोहचली. भारत आणि बांग्लादेशादरम्यान जवळजवळ १० हजार चौरस किमी क्षेत्रफळात हे जंगल व्यापले आहे.

प्रियकरासोबत केले लग्न

भारतात राहणाऱ्या आशिक मंडलसोबत कृष्णाची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आणि मैत्रीचे प्रेमात. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कृष्णाकडे पासपोर्ट नसल्यामुळे ती भारतात येऊ शकत नव्हती. मग तिने पोहून भारतात दाखल होण्याचा मार्ग स्वीकारला. भारतात पोहचल्यावर तिने तिचा प्रियकर आशिकशी कोलकातामधील मंदिरात लग्न केले.

दोघांची होणार ताटातूट?

या घटनेची माहिती पोलिसांना कळाली आणि त्यांच्या लक्षात आले की, कृष्णा पासपोर्टशिवाय भारतात पोहचली आहे. मात्र, तोपर्यंत दोघांचे लग्न झाले होते. अखेर पोलिसांनी लग्नानंतर कृष्णाला बेकायदेशीर रित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक केली. कृष्णाकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे तिला बांग्लादेशी सीमेवरील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रेमी युगलांची ताटातूट होऊ शकते.