दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील एका २२ वर्षीय व्यक्तीला स्थानिक न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एका अल्पवयीन तरुणीचे कथित अपहरण आणि बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात सुनावण्यात आली. ही मुलगी त्या व्यक्तीच्याच भागात राहणारी असून दुसर्‍या समाजातील आहे. दरम्यान ही शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे.

ही मुलीने वयाची १८ वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत आणि तिने आरोप केला आहे की, तिच्या वडिलांनी तिला न्यायालयात खोटी साक्ष देण्यास भाग पाडले. तसेच तिने तिच्या पालकांवर तिची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर तिने त्या व्यक्तीच्या कुटुंबाबरोबर राहण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. पोलिसांनी गुरुवारी एक बैठक आयोजित केली होती, ज्यामध्ये ती मुलगी, तिचे कुटुंब आणि आरोपीचे कुटुंब उपस्थित होते.

घरी गोंधळ घालत असल्याचे सांगून त्या मुलीच्या कुटुंबाने तिला घरात ठेवून घेण्यास नकार दिला आहे, तर आरोपीच्या कुटुंबाने देखील तिच्यामुळे त्यांच्या मुलाला तुरूंगात जावे लागल्याचे सांगत तिला स्वीकारण्यास नकार दिला आहे. यादरम्यान मुलीने तिच्या पालकांच्या घरी परत जाण्यास नकार दिला आहे, असे सहारणपूर येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

जेव्हा कोणताही तोडगा निघू शकला नाही, तेव्हा मुलीला मेरठ येथील महिलांच्या शेल्टर होममध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकऱ्यांनी पुढे सांगितले की, मुलीने प्रोटेक्शन होममध्ये जाण्यास होकार दिला, आणि त्यानुसार तिला तिथे पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक होण्यापूर्वी मुलगी आरोपीच्या घरी गेली आणि तिने तेथेच राहण्याचा आग्रह धरला होता.

माध्यमांशी बोलतानाचा तिचा कथित व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुलीने सांगितले की, ती तिच्या भावासोबत आणि मामासोबत आरोपीच्या घरी गेली होती. तिने आरोप केला की, तिच्या वडिलांनी तिला न्यायालयात आरोपीविरुद्ध खोटा जबाब देण्यास भाग पाडले होते. याव्यतिरिक्त, मुलीने दावा केला की, तिचे आई-वडील आणि नातेवाईकांना ती काळ्या जादूच्या प्रभावाखाली असल्याचे वाटते, मात्र तिने हा आरोप फेटाळून लावला.

मुलगी आरोपीच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, तिचे इतर नातेवाईक, तसेच एका हिंदू संघटनेचे सदस्य त्या घराबाहेर जमा झाले आणि त्यांनी पोलीस येईपर्यंत धरणे आंदोलन केले. पण तिच्या कुटुंबीयांनी तिला घरी घेऊन जाण्यास नकार दिला. दुसरीकडे तरूणाच्या कुटुंबीयांनी देखील त्या मुलीला त्यांच्याबरोबर ठेवून घेण्यास नकार दिला.

नेमकं प्रकरण काय आहे?

हे प्रकरण २०२२ सालचे असून तेव्हा ही मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांवर तिचे अपहरण केल्याचा आरोप केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला, यादरम्यान मुलीचा शोध घेण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आले.

त्यानंतर आरोपीला जामीन देण्यात आला. त्यानंतर कालांतराे पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचे आरोप लावले आणि त्याच्याविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याचे कलम देखील लावले.सुनावणीदरम्यान मुलीचा जबाब देखील न्यायालयात नोंदवण्यात आला.