नवी दिल्ली :  नवी दिल्लीच्या जहाँगीरपुरी हिंसाचाराच्या संबंधात दोन निरनिराळय़ा समुदायांतील २३ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सोमवारी सांगितले. हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेदरम्यान एका मशिदीवर भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.

दिल्लीतील जहाँगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करताना नजरेला पडलेल्या २८ वर्षांच्या एका तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव सोनू ऊर्फ इमाम ऊर्फ युनूस असून, तो जहाँगीरपुरीतील सी-ब्लॉकचा रहिवासी आहे. ‘निळय़ा सदऱ्यातील एक इसम जहाँगीरपुरीतील दंगलीदरम्यान गोळीबार करत असल्याचे दाखवणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत होता. ईशान्य जिल्ह्याच्या विशेष पथकाने त्याला पकडले आहे,’ असे पोलीस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितले.

१६ एप्रिलला हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेदरम्यान हिंसक चकमकी झडलेल्या वायव्य दिल्लीतील जहाँगीरपुरी भागात सोमवारी बहुतांश दुकाने बंद असल्याने  जनजीवनावर परिणाम झाला.   दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसक संघर्षांत ९ पोलीस व एक नागरिक जखमी झाला होता.

खरगोन हिंसाचारात एका मृत्यूची नोंद

खरगोन :  मध्य प्रदेशच्या खरगोन शहरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह सापडल्यामुळे दंगलीतील पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. इब्रेश खान याचा मृतदेह खरगोनच्या आनंदनगर भागात सापडला. मात्र येथे शीतपेटीची व्यवस्था नसल्यामुळे तो  १०० किलोमीटरवर असलेल्या इंदूरच्या शासकीय रुग्णालयात आठ दिवसांसाठी ठेवण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आठ दिवस हा मृत्यू लपवल्याचा आरोप इब्रेशच्या नातेवाईकांनी सोमवारी केला. तथापि, खरगोनमध्ये रामनवमी उत्सवादरम्यान दंगल उसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे ११ एप्रिललाच शवचिकित्सेनंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला. दगडांमुळे डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे इब्रेश मरण पावल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  ‘धार्मिक हिंसाचाराच्या रात्री खरगोनच्या आनंदनगर भागात एक अनोळखी मृतदेह सापडला. शीतपेटीची व्यवस्था नसल्याने तो इंदूरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला. इब्रेशच्या कुटुंबीयांनी १४ एप्रिलला तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर रविवारी मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे’, असे प्रभारी पोलीस अधीक्षक रोहित काशवानी यांनी पत्रकारांना सांगितले.