Crime News : सूरत येथे एक २३ वर्षीय शिक्षिका तिच्या अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेवर त्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, सापडल्यावर ही शिक्षिका ५ महिन्यांची गर्भवती असल्याची बाबा समोर आली असून हे मूल त्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे असल्याचा दावा तिने केला आहे. पोलिसांनी या महिलेला पळून गेल्याच्या ४ दिवसांनंतर राजस्थानच्या सीमेवरून ३० एप्रिल रोजी अटक केली. दरम्यान महिलेने दावा केला आहे की तिच्या पोटातील मूल हे १३ वर्ष वय असलेल्या मुलाचे आहे आणि त्यामुळेच या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान या घटनेमुळे शिकवणी वर्गांसारख्या ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, वैद्यकीय तपासणीमध्ये महिला गर्भवती असल्याचे उघड झाले आहे, तसेच प्रशासनाकडून डीएनए चाचणीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
नेमकं काय झालं?
अधिकार्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीनुसार शिक्षिका आणि तिच्या घरी शिकवणीसाठी येणारा विद्यार्थी या दोघांनी त्यांच्या-त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना रागवल्यामुळे एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिस अजूनही त्यांचे नेमके नाते काय आहे याबद्दल तपास करत आहेत.
एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, दोघे एकाच भागात राहातात आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. एप्रिल २५ रोजी विद्यार्थी अचानक बेपत्ता झाला. पण तो विद्यार्थी आणि शिक्षिका हे एकत्र जात असतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ रेकॉर्ड झाला. अखेर सुरतहून पळालेले दोघे वृंदावन आणि जयपूर येथे गेल्यानंतर दिल्लीला पोहचले.
“ते नवीन ठिकाणाचा शोध घेत होते आणि गुजरातला परत जात होते तेव्हा पोलिसांनी सुरतपासून सुमारे ३९० किमी अंतरावर राजस्थान सीमेजवळ एका खाजगी बसमध्ये शिक्षिकेचे लोकेशन ट्रेस केले. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि सुरतला परत आणण्यात आले,” असे डीसीपी भागीरथ गढवी म्हणाले.
अभ्यासावरून रागावल्यानंतर आई-वडीलांनी सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्या मुलाने पोलिसांना सांगितले. तर शिक्षिकेने कामावरून तिच्यावर ओरडण्यात आल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला. पोलीस अधिकार्याने सांगितले की, मुलाच्या वडीलांनी या शिक्षिकेने त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याची एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पोलीसांनी मानवी तसेच तांत्रिक सर्व्हेलन्सचा वापर करून पळून गेलेल्या शिक्षिकेचा ठिकाणा शोधून काढला, असे गढवी म्हणाले.