Andhra Pradesh Kurnool bus fire case : आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे बसला लागलेल्या आग प्रकरणाचा तपास सुरू असून यामध्ये एक नवीन अपडेट समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला होता, या अपघातावेळी त्या बसमध्ये २३४ स्मार्टफोन होते अशी महिती समोर आली आहे.
या स्मार्टफोन्सच्या बॅटरींच्या स्फोट झाल्याने बसला लागलेल्या आगीची तीव्रता वाढवण्याचे काम केले, असे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सुचवले आहे. या देशाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत २० जणांचा जळून मृत्यू झाला आहे.
४६ लाखांचे स्मार्टफोन
या २३४ स्मार्टफोन्सची किंमत ४६ लाख रुपये इतकी होती. हैदराबादमधील मांगनाथ नावाचा उद्योजकाकडून पार्सलच्या स्वरूपात हे स्मार्टफोन पाठवले जात होते . हे स्मार्टफोन बेंगळुरूमधील एका ई-कॉमर्स कंपनीला पाठवण्यात आले होते, जिथून हे फोन ग्राहकांना पुरवले जाणार होते.
प्रत्यक्षदर्शीनी फोन्सना जेव्हा आग लागली तेव्हा त्यांच्या बॅटऱ्यांच्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती दिली आहे.
आंध्र प्रदेशच्या फायर सर्व्हिस डिपार्टमेंटचे डायरेक्टर जनरल पी. व्यंकटरमण यांनी स्पष्ट केले की, स्मार्टफोनच्या स्फोटाव्यतिरिक्त बसमधील एअर कंडीशनिंग सिस्टीममध्ये वापरलेल्या इलेक्ट्रिकल बॅटरीचाही स्फोट झाला.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की सुरवातीला आग ही इंधन गळतीमुळे बसच्या पुढील भागात लागली. दुचाकी बसच्या खाली अडकली आणि त्यामुळे पेट्रोल सांडले त्याला उष्णता किंवा एखादा स्पार्क लागल्याने आग लागली जी लगेचच संपूर्ण वाहनात पसरली.
या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असून घटना स्थळावरील भीषण दृष्याचे वर्णन करताना व्यंकटरमण म्हणाले की, “आम्ही वितळलेल्या पत्र्यांतून हाडे आणि राख खाली पडताना पाहिले.” पुढे त्यांनी बसच्या बांधणीतील स्ट्रक्चरल त्रुटी देखील अधोरेखित केल्या. त्यांनी सांगितले की वाहनाचे वजन कमी करण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी लोखंडाऐवजी हलके ॲल्युमिनियम वापरण्याचा निर्णय संकटाच्या काळात धोकादायक ठरला आणि यामुळे अपघाताची तीव्रता वाढली.
