तुम्ही कंगना रणौतचा क्वीन चित्रपट बघितला असेल. लग्न तुटल्यानंतर निराश झालेली कंगना एकटीच हनिमूनला जाते आणि खूप मज्जा करते. या घटनेत असाच काहीसा प्रकार आहे पण गोष्ट थोडी वेगळी आहे. इथं मंडप आहे, वऱ्हाडी आहेत, नवरीही आहे, मात्र, नवरदेव नाहीये. कारण इथं नवरदेवाशिवाय लग्न लागणार आहे. हे ऐकून तुम्हीही चक्रावलात ना. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? पण हे खरं आहे. गुजरामधील २४ वर्षीय तरुणीने स्वत:सोबतच लग्न करण्याचा घाट घातला आहे.

क्षमा बिंदू असे त्या तरुणीचे नाव आहे. या लग्नासाठी जून महिन्यातील ११ तारखेचा मुहुर्त निघाला असून, लग्नासाठी क्षमाने कपडे आणि दागिन्याचीही खरेदी केली आहे. एवढंच नाही तर पार्लरही बूक केले आहे. क्षमाच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे.

म्हणून करणार स्वत:शीच लग्न
याबाबत क्षमा म्हणाली की, मला नवरी बनायचं होतं पण लग्न नाही करायचयं. त्यामुळे मी स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमाने अशा प्रकारचे कोणी लग्न केले आहे का? याचाही शोध घेतला. मात्र, आत्तापर्यंत स्वत:शीच लग्न कऱणारी व्यक्ती क्षमा आढळून आली नाही. त्यामुळे मी देशातील पहिली व्यक्ती असेन जिने स्वत:वरच्या प्रेमाचे एक वेगळे उदाहरण दिले आहे, असे क्षमा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नानंतर हनिमूनलाही जाणार
क्षमा गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत आपण लग्न करतो. पण माझं स्वत:वर प्रेम आहे म्हणून मी स्वत:सोबत लग्न करणार असल्याचे क्षमा म्हणाली. हे लग्न म्हणजे कोणत्याही अटीशिवाय स्वत:वर कसं प्रेम करायचं याचं उदाहरण असेल. समाज याबद्दल काय म्हणेल तो म्हणले मात्र, क्षमाच्या पालकांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. एका मंदिरात क्षमा स्वत:सोबतच लग्न करणार आहे. लग्नानंतर ती दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे.