जम्मूच्या कटूहा जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने चढविलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पोलिसांच्या राखीव सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. तर या हल्ल्यात नागरिक आणि पोलीस उपअधीक्षक यांच्यासह १० जण जखमीही झाले आहेत.
गेल्या एक-दीड वर्षात कटुहा जिल्ह्यात झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. शुक्रवारी सकाळी ६.२०च्या सुमारास तीन ते चार जणांच्या दहशतवाद्यांच्या टोळक्याने पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील पहारेकऱ्यांवर गोळीबार केल्याची माहिती कटुहाचे पोलीस उपायुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी दिली.
सध्या हे दहशतवादी पोलीस ठाण्याच्या आतमध्ये लपून बसले असून बाहेरील पोलीसांशी त्यांची तुफान धुमश्चक्री सुरू आहे. दरम्यान, या भागात पोलीसांची रहिवाशी वसाहत असल्याने दहशवाद्यांनी कोणाला ओलीस धरले आहे का, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
विशेष म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील ठप्प झालेली चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा हल्ला झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच इस्लामाबाद येथे दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनीच पाकिस्तानच्या विनंतीनूसार आर एस पुरा सेक्टर येथे दोन्ही देशांच्या लष्कराची ध्वजबैठकही झाली होती. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी लष्कराने सीमावर्ती भागातील भारतीय गावांवर जोरदार गोळीबार केला होता. गेल्या मार्च महिन्यात भारतीय लष्कराचे गणवेश घातलेल्या दहशतवाद्यांनी कटुहा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर गाडीतून जाताना बेछूट गोळीबार करत काही नागरिकांना जखमी केले होते. नरेंद्र मोदी यांनी हिरानगर येथे घेतलेल्या सभेनंतर अवघ्या काही दिवसांतच हा हल्ला करण्यात आला होता. याशिवाय, गेल्यावर्षी मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा असलेल्या अतिरेक्यांनी कटूहामधील हिरानगर पोलीस ठाण्यावर आणि २६ सप्टेंबर २०१३ रोजी सांबा येथील लष्करी छावणीवर हल्ला करून पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांसह १० जणांना ठार मारले होते.