राजधानीमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा सापडल्यामुळे मालदीव सरकारने ३० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आली आहे.
मालदीवमध्ये ३० दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली असून ही आणीबाणी बुधवारी दुपारी १२ पासून लागू करण्यात आल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचे प्रवक्ते मुआझ अली यांनी दिली. वाहनांच्या पार्किंगमध्ये मालवाहू गाडीत स्फोटके सापडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. येथील एका बेटावरील हॉटेलमध्येही स्फोटके सापडली असली तरी त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मालदीवच्या राष्ट्रीय लष्करी दलातही स्फोटके सापडली आहेत. ही स्फोटके ठेवणाऱ्यांचा तपास सुरू झाला आहे.
उपराष्ट्रापती अहमद अदीब यांना २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केल्यानंतर काही दिवसांतच ही धक्कादायक घटना घडली आहे. मालदीवचे वरिष्ठ राजदूत आणि अन्य चार जणांना राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.