चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एका १६ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत ३५ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. तसेच १० जणांची कसून चौकशी केली जात आहे. त्याशिवाय पोलिसांचे १२ पथक मुख्य आरोपी शोध घेत आहेत. बरेलीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा म्हणाले, की या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच यासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल.

या घटनेनंतर योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं असून आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. समाजवादी पार्टीने पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी कँडल मार्च काढला होता. दरम्यान चार दिवस उलटूनही आरोपींचा शोध घेण्यात यश आलं नसल्यानं पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री जफर अली नक्वी यांनी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. प्रियंका गांधींच्या सांगण्यानुसार नक्वी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलंय.

नेमकं काय घडलं?

गेल्या शनिवारी पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीची सामुहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. घटनेच्या दिवशी पीडिता सकाळी पावणेसात वाजता शाळेत जाण्यासाठी घरून बाहेर पडली. संध्याकाळी पाच वाजले तरी ती शाळेतून परतली नव्हती. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास पीडितेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत तिच्या घरापासून थोड्या अंतरावर आढळला.

मृतदेहाजवळ तिची सायकल आणि शाळेची बॅग सापडली. घटनास्थळावरून काही बिअरच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.