कलम ३७० हटवल्यापासून म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२१ या काळात काश्मीरमध्ये ३६६ दहशतवादी, ९६ नागरीक मारले गेले, अशी माहिती आज केंद्र सरकारने संसदेत दिली. राज्यसभेत या विषयी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली. आत्तापर्यंत या भागात सुरक्षा दलांच्या ८१ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.

काँग्रेस खासदार दिग्विजय सिंग यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. राय म्हणाले, एकही काश्मिरी पंडित किंवा हिंदू व्यक्ती काश्मीरमधून विस्थापित करण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या १० व्या दिवशी दिग्विजय सिंह यांनी विचारलेल्या दोन प्रश्नांचं उत्तर गृहमंत्रालयाकडून देण्यात आलं. त्यापैकी पहिला प्रश्न हा कलम ३७० हटवल्यापासून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या संख्येबद्दल होता.

हेही वाचा – Tamil Nadu Army Chopper Crash: बिपीन रावत रुग्णालयात दाखल; कॅबिनेट बैठकीत राजनाथ सिंग यांनी मोदींना दिली माहिती

या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले, काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून एकही काश्मिरी पंडित किंवा हिंदू व्यक्ती काश्मीर खोऱ्यात विस्थापित झालेली नाही. मात्र नुकतंच काही काश्मिरी पंडित परिवार, बहुतांश प्रमाणात काश्मीरमध्ये राहणाऱ्या महिला आणि मुलं जम्मू भागात वास्तव्य करत आहे. हे परिवार सरकारी कर्मचाऱ्यांचे आहेत. शैक्षणिक संस्थांना असलेल्या हिवाळी सुट्ट्या आणि आपल्या कामाच्या कारणामुळे जम्मूला गेले आहेत.

सिंह यांनी विचारलेला दुसरा प्रश्न म्हणजे – कलम ३७० हटवल्यानंतर तिथे मारले गेलेले दहशतवादी, सामान्य नागरीक आणि सुरक्षा दलाचे जवान यांची संख्या किती? या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले, ५ ऑगस्ट २०१९ म्हणजे कलम ३७० हटवल्यापासून ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत काश्मीरमध्ये ३६६ दहशतवादी, ९६ सामान्य नागरीक तर सुरक्षा दलाचे ८१ जवान मारले गेले आहेत.