फ्रँकफर्ट विद्यापीठाचा सुमारे ४० वर्षांपूर्वीची शैक्षणिक वास्तू (टॉवर) तब्बल ९५० किलो स्फोटकांचा वापर करून रविवारी जमीनदोस्त करण्यात आला. अतिशय नियोजनबद्धरित्या पार पडलेली ही मोहीम पाहण्यासाठी ३० हजार लोकांनी एकच गर्दी केली होती.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये १९७२ मध्ये ११६ मीटर (३८० फूट) उंचीची इमारत बांधण्यात आली होती. सुमारे ४० वर्षे या इमारतीमधून विद्यापीठाचा कारभार सुरू होता. मात्र गेल्या वर्षीच विद्यापीठाचा कारभार नव्या संकुलात हलविण्यात आला होता, तर विद्यापीठाच्या जुन्या जागेवर नवीन दोन टोलेजंग टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा ३८० फूट उंच टॉवर हळूहळू तोडण्यात येणार होता. मात्र या कामामुळे मोठय़ा प्रमाणात आवाज आणि धुळीचे साम्राज्य पसरणार असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी या दीर्घ कारवाईला विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाने स्फोटकांच्या साहाय्याने एकाच टप्प्यात हा टॉवर जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी तब्बल ९५० किलो  (दोन हजार ९५ पौंड) स्फोटके इमारतीच्या विविध मजल्यांवर लावण्यात आली. त्यानंतर टॉवरच्या भोवताली २५० मीटरचे वर्तुळ करून भाग निर्मनुष्य करण्यात आला. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत मग स्फोटकांच्या साहाय्याने एकाच फटक्यात टॉवर जमीनदोस्त करण्यात आला. या वेळी परिसरात मोठय़ा प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले. ही मोहीम पाहण्यासाठी सुमारे ३० हजार नागरिकांनी गर्दी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.