इराकच्या मोसुलमध्ये हरवलेले ३९ भारतीय १०० टक्के जिवंत आहेतच याची खात्री आम्ही देऊ शकत नाही असं वक्तव्य इराकचे परराष्ट्र मंत्री इब्राहिम अल जाफरी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे या भारतीयांचं काय झालं असेल याची चिंता आता चांगलीच वाढली आहे. मोसुलमधून आयसिसच्या अतिरेक्यांना हटविण्यासाठी सुमारे ९ महिने युद्ध सुरू होतं. या युद्ध काळात इराकमधून ३९ भारतीय बेपत्ता झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सगळ्या भारतीय नागरिकांना शोधण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत मात्र जिवंत असतील याची १०० टक्के खात्री आम्ही देऊ शकत नाही. मोसुलमधील हे ३९ भारतीय जिवंत आहेत की मारले गेले आहेत याबाबत आमच्याकडे तूर्तास ठोस माहिती उपलब्ध नाही असंही जाफरी यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मोसुजवळच्या बाडुशमध्ये असलेल्या तुरुंगात ३९ भारतीयांना ठेवण्यात आलं आहे अशी शक्यता भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वर्तवली होती. मात्र आता या सगळ्यांबाबत जाफरी यांचं वक्तव्य चकित करणारं आहे. तीन वर्षांपूर्वी इराकच्या मोसुलमधून या सगळ्या भारतीयांचं अपहरण करण्यात आलं होतं अशीही एक माहिती पुढे आली आहे. मोसुलवर इराकच्या सैन्यानं ताबा मिळवला असला तरीही काही भागांमध्ये युद्ध सुरू आहे अशीही माहिती पुढे येते आहे. हे युद्ध संपलं की बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांचा शोध घेतला जाईल असंही इराकनं म्हटलं आहे.

सुषमा स्वराज, वी. के. सिंह आणि एम. जे अकबर यांनी रविवारीच बेपत्ता ३९ भारतीयांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. २०१४ पासून मोसुलमधून हे सगळे भारतीय बेपत्ता आहेत. या सगळ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकारतर्फे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत, असंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं होतं.

२०१४ मध्ये इराकमधल्या मोसुलवर आयसिसनं ताबा मिळवला होता. या सगळ्यांना मोसुलमधून हटविण्यासाठी इराकी सैन्यानं मागील ९ महिने लढा दिला. आता मोसुलवर इराकनं पुन्हा कब्जा मिळवला असला तरीही या ३९ भारतीयांचा प्रश्न कायम आहे. या सगळ्यांचं काय झालं असेल ते जिवंत असतील की नाही? याबाबतही आता ठोस उत्तर देता येणं कठीण आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 missing indians iraqi foreign minister says not 100 sure whether they are alive or no
First published on: 24-07-2017 at 18:55 IST