4 Indians who went missing in US found dead : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील बफेलो शहरातून पेनसिल्व्हेनियातील पिट्सबर्ग शहराकडे रोड ट्रीप करत निघालेले चार भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून हे चारही जेष्ठ नागरिक रविवारी मृत अवस्थेत आढळले आहेत. या चौघांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे मार्शल काउंटी शेरीफ कार्यालयाकडून एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.
मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत कायर्यालयाने म्हटले की, “त्यांचे वाहन शनिवारी, २ ऑगस्ट रोजी साधारणपणे रात्री ९.३० वाजता बिग व्हीलिंग क्रीक रोडवरील एका उंच बांधाऱ्याजवळ आढळून आले. आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारे या घटनास्थळावर पाच तासांपेक्षा जास्त काळ होते. शेरिफ डगेट्री यांनी पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. “
दरम्यान या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.
आशा दिवाण, किशोर दिवाण, शैलेश दिवाण आणि गीता दिवाण अशी एकाच कुटुंबातील सदस्य असलेल्या चार जणांची नावे आहेत. या चौघांना अखेरचे मंगळवारी पेनसिल्व्हेनियाच्या एरी (Erie) येथील पीच स्ट्रीटवरील बर्गर किंग स्टोअरमध्ये पाहिले गेले होते, अशी माहिती सर्व्हेलन्स फुटेजच्या आधारे न्यूयॉर्क स्टेट गव्हर्नर कॅथी होचुल यांच्या कार्यालयातील एशियन अमेरिकन अँड पॅसेफिक आयलँडर अफेअर्सचे डायरेक्टर सिबू नायर यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे.
समोर आलेल्या फुटेजनुसार, कुटुंबातील दोन सदस्य, एक पुरुष आणि एक महिला हे इमारतीत प्रवेश करताना दिसत आहेत, येथेच त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डने अखेरचा व्यवहार केला होता, असे वृत्त WTOV News9 ने दिले आहे.
ते एका लाइट-ग्रीन रंगाच्या २००९ टोयोटा Camry या कारमधून प्रवास करत होते. त्यांनी पिट्सबर्ग येथे एका मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर त्यांचा वेस्ट व्हर्जिनीयामधील Moundsville शहरातील प्रभूपदाच्या पॅलेस लॉज होटेलकडे जाण्याचे नियोजन होते.