कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर काल (शनिवार) रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर ४० जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकासह १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर केला, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसाचारानंतर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याशिवाय जमावाने पोलिसांच्या काही वाहनांची देखील तोडफोड केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त लाभू राम यांनी सांगितले की, “हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे.”

पोलीस आयुक्त राम म्हणाले की, ”एका व्यक्तीने सोशल मीडियावर मुस्लीम समुदायाला लक्ष्य करत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती, ज्यावर इतरांनी आक्षेप घेतला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्या व्यक्तीवर करण्यात आलेल्या कारवाईवर समाधान न झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले आणि त्यांनी गोंधळ घातला.” तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आम्ही सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

याचबरोबर पत्रकारांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, एका पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

“एका पोलिस अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या काही लोकाना अटक करण्यात आली आहे. हा पूर्वनियोजित हल्ला होता,” असेही त्यांनी सांगितले आहे.